होमपेज › Nashik › नाशिक : पेपर तपासणीत घोळ; अभाविप-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आमने-सामने

नाशिक : पेपर तपासणीत घोळ; अभाविप-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आमने-सामने

Published On: Jun 18 2019 2:29PM | Last Updated: Jun 18 2019 4:16PM
नाशिक : प्रतिनिधी

वाणिज्य अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या पेपर तपासणीत घोळ झाल्याच्या प्रश्नावरून आज, मंगळवारी (दि.18) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या नाशिक उपकेद्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणारे अनेक विद्यार्थी बिझनेस रेग्युलटरी फ्रेमवर्क (एम.लॉ) या विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या पेपर तपासणीमध्ये घोळ झाला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत अभाविपकडून आंदोलन छेडले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सत्तेत असून हे आंदोलन करतात. हे केवळ नाटक असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनावरच आक्षेप घेतला. त्यामुळे वादाची ठिणगी पडली.

यातच घटनास्थळी पोलिसांना पाचारण केल्यानंतरही दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी सुरूच होती. त्यामुळे पोलिसांनी अभाविप आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यासह आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळाली.