Mon, Nov 19, 2018 11:28होमपेज › Nashik › वाहनाची काच तोडून सराफाला पंधरा लाखाचा गंडा 

वाहनाची काच तोडून सराफाला पंधरा लाखाचा गंडा 

Published On: Jun 07 2018 7:11PM | Last Updated: Jun 07 2018 7:11PMनाशिकरोड :वार्ताहर

येथील दत्त मंदिर रोड वर दुकानासमोरील चारचाकी वाहनाची काच तोडून रोख दीड लाख रुपये आणि सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लांबवली. रोख राकमेसह सुमारे पंधरा लाख चाळीस हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे व्यावसायिकाने सांगितले आहे. रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अभय अरुण शहाणे असे सराफी व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे नाशिकरोड येथील दत्त मंदिर रोडवर ड्रीम हाऊस सोसायटीमध्ये शहाणे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी पावणेबारा वाजता ही घटना घडली. अभय शहाणे यांनी दुपारी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुकानातील स्वच्छता झाल्यानंतर ते दुकानाबाहेर पाठीमागे पिण्याचें पाणी घेण्यासाठी गेले. त्यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी दुकानाबाहेर पार्किंग केलेल्या शहाणे यांच्या वाहनाची डाव्या बाजूच्या काच फोडली. त्यामधील शहाणे यांची बॅग चोरट्यांनी लंपास केली. अचानक मोठा आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक शहाणे यांच्या चारचाकी वाहना जवळ जमले . यादरम्यान शहाणे देखील वाहना जवळ आले . त्यांनी पुढच्या बाजूला बाजूला पाहिले असता सोन्याचे दागिने आणि रोख दीड लाख रुपये असलेली बॅग चोरट्यांनी गायब केल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती उपनगर पोलिसांना कळवली. सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते आदींसह पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले  दरम्यान दत्त मंदिर रोडवर असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्याची पाहणी पोलीस करीत आहे.

एकदा गोळीबाराची घटना 

काही वर्षापूर्वी शहाणे ज्वेलर्सवर बंधूकधारी चोरट्यानी हल्ला केला होता. यामध्ये अभय शहाणे गोळी लागून जखमी झाले होते. यानंतर आता पुन्हा शहाणे यांच्या चारचाकी वाहनाची काच फोडून त्यामधील सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली. दिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.