होमपेज › Nashik › जांगडगुत्ता : हॅशटॅगचे चॅलेंज...

जांगडगुत्ता : हॅशटॅगचे चॅलेंज...

Published On: May 27 2018 9:14AM | Last Updated: May 27 2018 9:14AMप्रदीप भागवत

आजकाल जो उठतो तो सोशल मीडियावर कोणाला तरी चॅलेंज देताना दिसतोय. हे सगळे सुरू केले क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी. हम फिट तो इंडिया फिट, अशा हॅशटॅगने त्यांनी सुरू केलेले हे चॅलेंज हळूहळू पसरत गेले. नंतर मग तमाम राजकारणी, सेलिब्रिटी एकमेकांना चॅलेंज देत सुटले आहेत. आता या चॅलेंजची सर्वसाधारण रूपरेषा काय तर आपला व्यायाम करतानाचा व्हिडिओ शूट करायचा. मग तो कोठेही शूट केलेला असला तरी चालतो. अगदी ऑफिसात, रस्त्यावर, बागेत कुठेही. आणि टाकायचा सोशल मीडियावर आणि आपल्याला ज्याला वाटेल त्याला तसे करण्याचे चॅलेंज द्यायचे. बर्‍याच दिवसांनी ट्विटर उघडले तर असे हजारो चॅलेंज आमच्या स्क्रीनवर आदळले. अगदी ढेरपोटे लोकही स्वत:ला खलीचा अवतार समजून पटापटा व्यायाम करताना त्यात दिसून आले. अंगात कोट, पायात चमड्याचे बूट, गळ्यात टाय अशा थाटातील लोकही दहा पुशअपस् मारून कोणाला तरी चॅलेंज देताना आढळले. मागच्या 50 वर्षांत यांनी कधी तोंडातून व्यायामाचा ‘व्या’सुद्धा काढला नाही, असे लोकही व्यायामावर लेक्‍चर देऊन वर चॅलेंज देतानाही दिसले. असो. अशा या चॅलेंजमध्ये काही चॅलेंजेसनी मात्र आमचे लक्ष वेधून घेतले.

चॅलेंज देण्या-घेण्यात आघाडीचे नाव म्हणजे विराट कोहली. त्याला एका पठ्ठ्याने चॅलेंज टाकले की, आयपीएलमधील एका सामन्यात प्रत्येक फिल्डर प्रत्येकी एक एक कॅच सोडतील, एवढे झाल्यानंतरही विराटने कोई बात नहीं, म्हणत त्या प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचे. थोडीशीसुद्धा किरकिर करायची नाही. आता हे चॅलेंज म्हणजे शक्‍तीकपूरला चित्रपटात थोडं सज्जन माणसासारखं वाग की, असे चॅलेंज देण्यासारखेच झाले. एकाने राजकारण्यांना 15 मिनिटे निवडणूक प्रचारात बोलतात तसे न बोलता साधेसरळ बोलण्याचे चॅलेंज दिले. आता हेही कोणी अ‍ॅक्सेप्ट करील असे वाटत नाही. तोंडासमोर माईक असो नाही तर नसो नेहमीच बेंबीच्या देठापासून एकाच तालासुरात बोलणार्‍या राजकारण्यांना हे चॅलेंज अवघडच जाईल असे दिसते.

बहुतेक या मंडळींनी घशाचा विमा काढलेला असावा, म्हणूनच ते इतक्या सहजतेने घसा फोडून बोलू शकत असावेत. ‘बिग बी’ अमिताभ यांनाही साधारणत: त्यांच्याच तरुणपणाच्या काळातील एका अभिनेत्रीने परत एकदा एकत्र चित्रपटात काम करण्याचा ‘सिलसिला’ सुरू करण्याचे चॅलेंज टाकल्याचेही आढळले. अर्थातच ‘बिग बी’ त्याकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा करतील, यात शंकाच नाही. हो, हा
सिलसिला सुरू झाला तर घरात नसती ‘दीवार’ उभी राहायची.

आळशीबुवा रंजेगाव येथील एका व्यक्‍तीने ट्विट करून चक्‍क द. कोरियाच्या किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्पला चॅलेंज दिले. यात तो दिवाळीच्या सुरसुर्‍या आणि लवंगी फटाके उडवताना दिसतो. ट्रम्प आणि उन यांच्याकडे यापेक्षा जास्त क्षमतेचे काही असेल तर त्यांनी ते दाखवून द्यावे, असे ते चॅलेंज होते. आता हे चॅलेंज ट्रम्प आणि उन यांच्यापर्यंत न पोहोचले म्हणजे मिळविले. सर्वात शेवटी म्हणजे एका औरंगाबादकरानेही महापालिकेला एक चॅलेंज दिले, ते सांगणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. यात महापालिकेने औरंगाबादकरांना एक दिवसाआड पाणी पुरवण्याचे चॅलेंज दिले आहे. आता हे चॅलेंज वाचूनच आमच्या डोळ्यांत पाणी आले. त्यामुळे इतर अनेक चॅलेंज आम्ही वाचूच शकलो नाहीत.