Fri, Jul 19, 2019 05:16होमपेज › Nashik › जवानाच्या पत्नीवर अत्याचार करून दिरानेच केला खून

जवानाच्या पत्नीवर अत्याचार करून दिरानेच केला खून

Published On: Jul 05 2018 5:20PM | Last Updated: Jul 05 2018 7:27PMजळगाव : प्रतिनिधी

सैन्यदलातील जवानाच्या पत्नीवर दिरानेच अत्याचार करून खून केल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या दिरासह सासू, आजेसासू विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील कुंझर येथील जवान रामचरण बैरागी हे ग्वाल्हेर येथे कर्तव्यावर असून, त्यांच्या पत्नी प्रियांका रामचरण बैरागी (26) या सासू, सासरे, दीर यांच्यासमवेत आपल्या दोन मुलांसह राहत होत्या. दोन जुलैरोजी सासरे हे जवान रामचरण यांना भेटण्यासाठी ग्वाल्हेर येथे गेल्याने घरी प्रियांका, सासू, आजेसासू, दीर व दोन लहान मुले हेच घरी होते. याच दरम्यान, चार जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रियांका बैरागी या आपल्या खोलीत छताला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्या.

याबाबत प्रियांका यांच्या घरी माहिती कळाल्यानंतर त्यांचे आई, वडील, काका व भाऊ यांनी प्रियांका यांच्या घरी धाव घेतली. त्यावेळी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली. मात्र, याबाबत प्रियांका यांच्या आई-वडिलांनी खुनाची शंका उपस्थित करत, चौकशीची मागणी केल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविताच प्रियांका यांचा दीर संशयित प्रवीण छगनदास बैरागी (24) यानेच बलात्कार करून खून केल्याचे तसेच यात सासू भिलाबाई छगनदास बैरागी, आजेसासू विमलबाई भिकन बैरागी यांनी त्याला साथ दिल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर प्रियांका यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्‍न झाले आहे. याप्रकरणी संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.