Thu, May 23, 2019 20:50
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › डिजिटल सातबार्‍यांचे सदाभाऊ खोत यांच्या हस्ते लोकार्पण

डिजिटल सातबार्‍यांचे सदाभाऊ खोत यांच्या हस्ते लोकार्पण

Published On: May 01 2018 4:33PM | Last Updated: May 01 2018 4:35PMजळगाव  :  प्रतिनिधी

ग्रामीण भागातील नागरीकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेला 7/12 आजपासून राज्यातील जनतेला ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीने मिळण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आज कृषि, पणन राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उप जिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, यांच्यासह निवडक मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

ग्रामीण भागात प्रत्येक गोष्टीसाठी पदोपदी 7/12 ची आवश्यकता भासते. हा 7/12 नागरीकांना संगणकीय पध्दतीने घरबसल्या ऑनलाईन मिळाला पाहिजे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुलमंत्री चंद्रकांत पाटील हे आग्रही होते. याकरीता गेल्या दोन वर्षापासून रि एडिट आज्ञावलीचा वापर करून राज्यातील महसुल यंत्रणा रात्रंदिवस काम करीत होती. विशेषत: याकरीता राज्यातील तलाठी वर्ग या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करीत होता. याची फलनिष्पती म्हणून आजपासून नागरीकांना संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला 7/12 मिळण्यास सुरुवात झाली आहे. संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबाराचे कामे महसुल यंत्रणेने पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री, महसुलमंत्री यांनी यंत्रणेचे विशेषत: तलाठ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आज महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सहृयाद्री अतिथिगृह, मुंबई येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना बोलत होते. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या उपक्रमाचे लोकार्पण ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मंत्री, राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडले.

या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातील 1503 गावांपैकी 1456 गावांमध्ये हे काम पूर्ण झाले असून, एरंडोल, बोदवड, भडगाव, यावल व रावेर तालुक्यात ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरी 7/12 चे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. याबद्दल आज ना. खोत यांच्या हस्ते फैजपूरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले, एरंडोलच्या तहसीलदार  सुनिता जऱ्हाड, बोदवडचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात, भडगावचे तहसीलदार छगन वाघ, यावलचे तहसीलदार कुंदन हिरे व रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे यांचा ना. खोत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर याच तालुक्यातील शेतकरी  विनोद वाघमोडे, बळीराम चौधरी, कडु चौधरी, भगवान फेगडे, रामदास पाटील, नारायण चौधरी, छत्तरसिंग बारेला, चंद्रकांत पाटील व  इंदिराबाई पाटील यांना प्रातिनिधीक स्वारूपात संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीचा 7/12 खोत यांच्या हस्ते देऊन या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.