Tue, Jul 23, 2019 10:31होमपेज › Nashik › मनपाच्या चार अधिकार्‍यांवर दोषारोप निश्‍चित

मनपाच्या चार अधिकार्‍यांवर दोषारोप निश्‍चित

Published On: Mar 09 2018 1:35AM | Last Updated: Mar 08 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी

कोट्यवधी रुपयांचा गफला करून कामकाजात अनियमितता केल्याप्रकरणी मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी चार अधिकार्‍यांवर दोषारोप निश्‍चित करून त्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दहा दिवसांत लेखी खुलासा संबंधित अधिकार्‍यांकडून प्राप्‍त झाल्यानंतर आयुक्‍त अंतिम फैसला जाहीर करणार असल्याने अधिकार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दरम्यान, प्रशासनातील अनेक अधिकारी या चौकशीत अडकलेल्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, आयुक्‍त मुंढे यांनी या चौकशीच्या फाइल पुन्हा उघडून अधिकार्‍यांची कुंडलीच बाहेर काढली आहे. 

आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी मनपाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच आठ दिवसांत चौकशी प्रलंबित असलेल्या अधिकार्‍यांची कुंडली मागावून घेतली. आयुक्‍तांनी आठच दिवसांत आपला कारभार दाखविल्यानंतर मनपातील अनेकांना पळती भुई थोडी झाली. यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी जुन्या चौकशीच्या फाइल पुन्हा बाहेर काढल्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बहुतांश अधिकारी व कर्मचार्‍यांच्या चौकशा प्रलंबित ठेवून संबंधितांना पाठीशी घालण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू होता. यासंदर्भात महासभा आणि स्थायी समितीत सदस्यांनी विचारणा केल्यानंतरही अधिकार्‍यांवर कोणताच परिणाम होत नव्हता. परंतु, आता मुंढे यांनी प्रलंबित चौकशीच्या प्रकरणांचा तपशील मागावून घेतला असून, त्याबाबत तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे. विशेष म्हणजे यातील अनेक प्रकरणांत चौकशी अधिकारी व इतर काही अधिकार्‍यांनी चौकशीच्या फेर्‍यात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. त्यासाठी चौकशी अहवालावर टिपण्णी लिहून संबंधित अधिकार्‍यांना वाचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. परंतु, आयुक्‍त मुंढे यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही. 

या अधिकार्‍यांवर दोषारोप

अभियंता आर. के. पवार, उद्यान अधीक्षक गो. बा. पाटील, अग्निनशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन, डॉ. हिरामण कोकणी यांना गेल्या 28 फेब्रुवारीला अंतिम कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तत्पूर्वी, संबंधितांवर दोषारोप निश्‍चित केले असून, नोटिसा मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत लेखी खुलासा करण्यास सांगितले आहे. यामुळे येत्या काही दिवसांत खुलासा प्राप्‍त झाल्यानंतर आयुक्‍त संबंधितांवर कारवाई करून त्यांचा अहवाल महासभेवर मंजुरीसाठी सादर करतील. अतिरिक्‍त आयुक्‍त दर्जाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी महासभेची मंजुरी आवश्यक असते. त्यानुसार आर. के. पवार आणि गो. बा. पाटील तसेच अनिल महाजन यांच्यावरील कारवाईचा अहवाल महासभेवर सादर केला जाईल. महासभा या अहवालावर काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

डॉ. कोकणींची फॉरेन टूर ः पाच ते सहा महिन्यांपूर्वी पंचवटीतील मायको दवाखाना येथे एका महिलेची प्रसूती ऑटोरिक्षात झाली होती. तेथील कर्मचारी व डॉक्टरांचा हलगर्जीपणा त्यास कारणीभूत ठरविण्यात आला. या प्रकरणाची चौकशी केली असता तेथील डॉ. कोकणी व त्यांचे काही सहकारी कोणतेही कारण न देताच रजेवर असल्याचे समोर आले होते. अधिक माहिती घेतली असता डॉ. कोकणी व काही सहकारी फॉरेन टूरवर असल्याचे समोर आले होते. परदेशात जायचे असेल तर आयुक्‍तांची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु, डॉ. कोकणी यांनी अशी कोणतीच परवानगी न घेता परदेश गाठले. त्यातही रजेवर जाण्याचे कारण लपविले आहे. परंतु, त्यांच्या चौकशीतून वैद्यकीय विभागातीलच काही अधिकार्‍यांनी ही वस्तुस्थिती आयुक्‍तांपासून लपवून ठेवल्याचेही उघड झाले आहे. यामुळे या प्रकरणात आयुक्‍त काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.