Sun, Nov 18, 2018 18:45होमपेज › Nashik › अंगणवाडीच्या पोषण आहारात गोम!

अंगणवाडीच्या पोषण आहारात गोम!

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 05 2018 11:25PMइगतपुरी : वार्ताहर

तळेगाव येथे अंगणवाडीत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पोषण आहाराच्या खिचडीत  गोम या प्रकारातील किडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा पोषण आहार खाल्ल्याने दोन बालकांना व एका महिलेला अस्वस्थ वाटू लागले. त्यांना उपचारार्थ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची चौकशी करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे.गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास अंगणवाडी सेविका मंगला हरिनामे या गैरहजर असल्याने अंगणवाडीतील मदतनीस जया शिंदे यांनी तळेगाव येथील अंगणवाडीतील बालकांना घरोघरी जाऊन पोषण आहार वाटप केला. 

सहा महिन्याच्या शुभांगी सुरेश कुंदे या बालिकेच्या घरी खिचडी दिल्यानंतर त्या निघून गेल्या. या बालिकेची आई शीतल सुरेश कुंदे या महिलेने हा आहार खाल्ल्याने तिला उलट्या होऊ लागल्या. त्वरित त्यांचे कुटुंबीय व श्रमजीवी संघटनेचे तानाजी कुंदे यांनी या आहाराची तपासणी केली असता त्यात गोम आढळून आली. कुंदे यांनी तत्काळ बालविकास प्रकल्प अधिकारी सोपान ढाकणे यांना ही माहिती दिली.अंगणवाडीतील इतर बालकांना विषबाधा झाल्याची खात्री केली. दरम्यान, शीतल कुंदे या महिलेसह खबरदारी म्हणून तिची सहा महिन्याची मुलगी शुभांगी, तसेच अंगणवाडीचे विद्यार्थी युवराज पांडुरंग धनगर (3), नंदिनी विजय वर्मा (3) या चारही जणांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे, संतोष ठोंबरे यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केली.