Sat, Aug 24, 2019 23:17होमपेज › Nashik › विविध विभागांच्या अधिकार्‍यांना जिल्हधिकार्‍यांनी खडसावले

विविध विभागांच्या अधिकार्‍यांना जिल्हधिकार्‍यांनी खडसावले

Published On: Aug 31 2018 1:40AM | Last Updated: Aug 30 2018 11:47PMनाशिक : प्रतिनिधी

गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या  जिल्हा उद्योगमित्र (झूम) च्या बैठकीत सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील प्रलंबित प्रश्‍नांवर ठोस कार्यवाही झाली नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी विविध विभागांच्या अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले. यापुढील बैठकीत  संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांना बैठक अनिवार्य राहणार असून, आपल्या परवानगीनेच अधिकार्‍यांनी रजा घ्यावी, असे आदेशही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले अंबडचे प्रलंबित अग्निशमन केंद्र त्वरित सुरू करण्याच्या सूचनाही राधाकृष्णन बी. यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी ‘झूम’ ची बैठक पार पडली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी.डी.रेंदाळकर, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, सीमा पवार यांच्यासह   विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी उद्योजकांनी  प्रलंबित प्रश्‍न मांडले. त्यावर संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे जिल्हाधिकारी संतापले. त्यानंतर अंबड येथे गेल्या एक वर्षापासून तयार झालेले अग्निशमन केंद्र केव्हा सुरू होईल, असा प्रश्‍न उद्योजकांनी विचारला. त्यावर एमआयडीसीचे विखे यांनी शासनाकडे अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन वाहन यासाठी  शासनाकडे एप्रिल महिन्यात पाठपुरावा सुरू  केल्याचे सांगितले.

यावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी एप्रिलनंतर काही पाठपुरावा केला का? असा प्रश्‍न केला. त्यावर विखे यांंच्या मदतीला एमआयडीसीच्या सीमा पवार धावून आल्या आणि दोघांनीही सांगितले की, तत्काळ शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येईल तर सातपूर प्रमाणे हे अग्निशमन केंद्र महापालिकेकडे स्थलांतरित करण्याची मागणीदेखील काही उद्योजकांनी केली. मात्र, महापालिकेचे अधिकारी नसल्याने याबाबत निर्णय होऊ शकला नाही. याप्रसंगी निमाचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव, राजेंद्र जाधव, तुषार चव्हाण, धनंजय बेळे, ललित बूब, सुरेश पवार, सुधाकर देशमुख, संजय महाजन, कैलास वराडे, नितीन वागस्कर, राजेंद्र कोठावदे, उदय रकिबे, चंद्रकांत दीक्षित, मनीष रावळ, राजू अहिरे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.