Wed, Feb 20, 2019 21:31होमपेज › Nashik › गुजरातमध्ये ईव्हीएमऐवजी चिठ्ठी पद्धतीने मतदान घ्या

गुजरातमध्ये ईव्हीएमऐवजी चिठ्ठी पद्धतीने मतदान घ्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत गुजरातचे मॉडेल देशासमोर ठेवणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येच आता शेतकरी आणि व्यापार्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. देशात विद्यार्थ्यांपासून ते उद्योगपतीपर्यंत कोणीही सुखी नाही. सरकारच्या कारभारावर सर्वजण नाराज आहेत. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी होणार नाही आणि झालाच तर तो फक्त ‘ईव्हीएम’ घोटाळ्यामुळे होईल, असा टोला काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी भाजपाला लगावला.

संविधान दिनानिमित्त शहर काँग्रेस कमिटीत झालेल्या पत्रकार परिषदेत मोहन प्रकाश बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोहन प्रकाश म्हणाले, गुजरातची निवडणूक तेथील जनता विरुद्ध नरेंद्र मोदी अशी होत आहे. त्यामुळे तेथे लोकशाही पद्धतीने भाजपाचा विजय होऊच शकत नाही. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांना विजयाची खात्री असेल तर त्यांनी ईव्हीएम मशीनऐवजी चिठ्ठी पद्धतीने मतदान घेण्याचे खुले आव्हान त्यांनी भाजपाला दिले. ईव्हीएम मशीनमधील घोळ मान्य केल्यास सर्व निवडणुका पुन्हा घ्याव्या लागतील, या भीतीने निवडणूक आयोग हा घोळ मान्य करत नाही. देशातील जनतेचा आता ईव्हीएमवर विश्‍वास राहिलेला नाही. तो विश्‍वास संपादन करायचा असेल, तर पुन्हा चिठ्ठी पद्धतीचा अवलंब करायला हवा, त्यामुळे  लोकशाही अधिक मजबूत होईल. विरोधात असताना भाजपानेही ईव्हीएमला विरोध केला असल्याचेही प्रकाश यांनी सांगितले.

आरएसएस संविधानविरोधी

स्वातंत्र्याच्या लढाईत स्वातंत्र्यसैनिक पांढर्‍या रंगाच्या खादीचे कपडे आणि टोपी वापरत. प्रसंगी प्राणही देत, मात्र त्यांचा विरोध करीत आरएसएसचे स्वयंसेवक  काळी टोपी वापरत. आरएसएसची तेव्हा इंग्रजांशी भागीदारी होती, आताही ते परदेशी सत्तेला पूरक निर्णय घेत आहेत. त्यामुळे संविधान धोक्यात असल्याचे मोहन प्रकाश म्हणाले.