होमपेज › Nashik › मामी-भाचाचे अनैतिक संबंध;बोलठाण येथे नोकराचा खून

मामी-भाचाचे अनैतिक संबंध;बोलठाण येथे नोकराचा खून

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:21AMनांदगाव : प्रतिनिधी 

अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ नये, म्हणून बोलठाण येथे एकाचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावण्याची घटना उघडकीस आली आहे. नांदगाव पोलिसांनी 24 तासांत घटनेचा उलगडा करून एका संशयिताला अटक केली आहे.

ताराचंद बुधा जाधव (42, रा. चिंचखेड तांडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. मामी आणि भाचा यांच्यात असलेल्या अनैतिक संबंधाची वाच्यता होऊ, नये म्हणून नोकराचा खून झाल्याचे उघड झाले आहे. नांदगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताला खूनप्रकरणी ताब्यात घेतले आहे.  संशयिताचे लग्‍न जमत नसल्याने तो मामाच्या गावी कामधंदा शोधण्यासाठी बोढरे (ता. वैजापूर) येथे राहण्यास आला  होता. तो मामा, मामीसोबत शेळ्या-मेंढ्या राखण्यासाठी वाड्या-वस्तीवर राहत होता. याच दरम्यान त्याचे मामीबरोबर सूत जमले. दरम्यान, जंगलात त्यांना शेळ्या चारताना मयत ताराचंद याची भेट झाली. तोदेखील कामधंद्याच्या शोधात पायी फिरत होता.

काही दिवसांपासून ताराचंदही त्यांच्यासोबतच राहत होता.  मात्र, ताराचंदने संशययित व त्याच्या मामीचे अनैतिक संबंध पाहिले होते. या संबंधांची वाच्यता ताराचंदने मामाकडे करू नये म्हणून संशयिताने कट करून ताराचंदला बोलठाण येथे मद्यपानासाठी बोलावले. तेथे दोघे बसले असताना त्यांची अनैतिक संबंधांवर चर्चा झाली. त्यातून बाचाबाची आणि वादावाद  झाला. याच दरम्यान संशयिताने कुर्‍हाडीच्या दांड्याने ताराचंदवर घाव घातले. त्यात ताराचंद गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडला. यानंतर संशयिताने ताराचंदचे प्रेत बोलठाण बाजार समितीच्या बाजूला असलेल्या काटेरी कुंपणात फेकून दिले. मात्र, प्रेताची पोलिसांना माहिती मिळाली. त्याची दखल घेत पोलिसांनी तपासात हा खून असल्याचे हेरून संशयिताच्या मुसक्या आवळल्या.