Mon, Mar 25, 2019 09:12होमपेज › Nashik › ‘त्या’ कर्मचार्‍यांची होणार ग्रामीणमध्ये बदली 

‘त्या’ कर्मचार्‍यांची होणार ग्रामीणमध्ये बदली 

Published On: Jun 25 2018 1:50AM | Last Updated: Jun 24 2018 11:53PMनाशिक : प्रतिनिधी

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतच दुचाकी आणणार्‍यांसह दुचाकी पार्क करणाचा मुद्दा वृत्त दैनिक पुढारीने मांडताच जिल्हा रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार दुचाकी आणणार्‍या कर्मचार्‍यांचा शोध घेत त्यांची रवानगी थेट ग्रामीण रुग्णालयात करणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.

‘सिव्हिलच्या मुख्य इमारतीतच कर्मचार्‍यांकडून दुचाकी पार्किंग’ या मथळ्याखाली रविवारी (दि.24) दैनिक पुढारीने कर्मचार्‍यांच्या बेशिस्तपणाबाबत वाचा फोडली. सुरक्षा रक्षक असतानाही रुग्णालयातील काही कर्मचारी व सुरक्षारक्षक त्यांच्या दुचाकी रुग्णालयाच्या इमारतीतच पार्क करीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. त्यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत कर्मचार्‍यांनाच साशंकता असल्याचे चित्र आहे. तसेच, सुरक्षारक्षकही रात्रीच्या वेळी झोप काढण्यात किंवा मोबाइलमध्ये रममाण झाल्याचे नेहमीचे चित्र असल्याने रुग्णालयातील काही कर्मचारी सुरक्षारक्षकांना न जुमानताच त्यांची वाहने रुग्णालयाच्या इमारतीत आणत आहेत. हे वृत्त प्रसिद्ध होताच डॉ. जगदाळे यांनी त्याची गंभीर दखल घेत संबंधित दुचाकी मालकांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. ज्या कर्मचार्‍यांची वाहने इमारतीत असतात त्यांची बदली ग्रामीण रुग्णालयात करण्याचे आदेश डॉ. जगदाळे यांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधित दुचाकी चालकांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात असल्याने ‘त्या’ कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.