Mon, Jun 24, 2019 16:39होमपेज › Nashik › नाशिक : हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून एकावर गोळीबार

नाशिक : हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून एकावर गोळीबार

Published On: Dec 19 2017 5:32PM | Last Updated: Dec 19 2017 5:31PM

बुकमार्क करा

सातपूर : वार्ताहर

सातपूर येथील श्रमिकनगरमधील सातमाऊली चौकाजवळ हॉर्न का वाजवतोस असे विचारल्याच्या रागातून परप्रांतीय युवकाने गावठी पिस्तुलव्दारे गोळी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवार दि.१९ रोजी दुपारी २ वाजता घडली. याबाबत अधिक माहिती अशी की; राम बाबू वाल्मिक (रा.सातमाऊली चौक, श्रमिकनगर) हा आपला मित्र गिरीश मोरे व इतर मित्रांसोबत चौकात थांबले होते. त्याचवेळी संशयित नंदन जयस्वाल (२१, अजमगड, उत्तर प्रदेश. ह. रा श्रमिकनगर ) हा आपल्या दुचाकीवरून हॉर्न वाजवत जात होता. यावेळी राम वाल्मिकने हॉर्न का वाजवतो असे विचारले. यानंतर संशयित नंदन याने घरी जाऊन मित्राला व गावठी पिस्‍तूल घेऊन आला. यावेळी राम वाल्‍मिकीवर गोळीबार करण्याचा प्रयत्‍न केला. मित्रांनी झटापट केल्याने हवेत गोळीबार झाला. आवाजामुळे नागरिक जमा झाल्यानंतर संशयित नंदन व त्याचा मित्र पसार झाला. यामध्ये राम व त्याचा मित्र जखमी झाला आहे.

या घटनेची सातापूर पोलिसांना माहिती समजाताच घटनास्‍थळी दाखल झाले. सहाय्यक पोलिस आयुक्‍त सचिन गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षण राजेश आखाडे व पोलिस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत. नंदनच्या पालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून संशयिताला अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

सातपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीयांची संख्या मोठी आहे. विशेष करून श्रमिकनगर, शिवाजीनगर, सातपूर राजवाडा, प्रबुद्धनगर, स्वारबाबानगर आदी भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी अनेकवेळा करण्यात आल्या आहेत. याआधीही परप्रांतीयाकडे अवैध गावठी पिस्तुल असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे. त्यामुळे अशा बेकायदा हत्यारे बाळगणार्‍याचा बंदोबस्‍त करण्याची मागणीही परिसरातील नागरिकांनी केली आहे.