Thu, Jun 27, 2019 16:01होमपेज › Nashik › नाशिकमध्ये दुधाने गाठली पंचाहत्तरी

नाशिकमध्ये दुधाने गाठली पंचाहत्तरी

Published On: May 19 2018 1:34AM | Last Updated: May 19 2018 12:00AMनाशिक : प्रतिनिधी

मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान पर्वास शुक्रवार (दि.18) पासून प्रारंभ झाला असून, बाजारात दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे. दुधाचे दर गगनाला भिडले असून, दुधाची 70 ते 75 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत आहे. दोन दिवसांपूर्वी दुधाचे दर हे 60 रुपये प्रतिलिटर होते. दरम्यान, दुधाच्या पुरवठ्यात वाढ न झाल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शहरात दूध बाजार हे दूध विक्रीचे प्रमुख केंद्र आहे. शहर व आजूबाजूच्या परिसरातून या ठिकाणी व्यावसायिक दूध विक्रीसाठी आणतात. उन्हाळ्यामुळे अगोदरच दूध व दुधाचे पदार्थ ताक, लस्सी आदी थंडपेयांना मागणी आहे. त्यात रमजान पर्वाला प्रारंभ झाला आहे. रमजानमुळे या ठिकाणी दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे. दुधाचा पुरवठा वाढला असला तरी मागणीदेखील जादा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याची परिणती म्हणजे दुधाचे दरदेखील वाढले आहेत. रमजानच्या पहिल्या दिवशी दूध बाजारात दुधाची 70 ते 75 रुपये प्रतिलिटर दराने विक्री होत होती. रमजान पर्वात दूध व दुधाच्या पदार्थांना जादा मागणी असते. मुस्लिम बांधव दिवसभर काहीही सेवन न करता कडक उपवास धरतात. त्यामुळे पहाटे सहेरीच्यावेळी दूध सेवन करतात.

तर इफ्तारच्यावेळी दुधापासून तयार झालेल्या फालुद्यावर सायंकाळी रोजा सोडतात. तसेच रमजान पर्वात मिठाई दुकानांमध्ये मलई बर्फी, फेणी, नानपाव, फालुदा, सरबत, कस्टर पुडीन आदी पदार्थ विक्रीसाठी तयार केले जातात. रमजान काळात या पदार्थांना खवय्यांची मोठी मागणी असते. मुस्लिम बांधव घरातदेखील हे पदार्थ तयार करतात. त्यामुळेदेखील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रमजान पर्वाच्या अखेरपर्यंत दुधाचे दर हे चढे राहण्याची शक्यता आहे.