होमपेज › Nashik › तापमान चाळिशीचा दहा वर्षांतील उच्चांक!

तापमान चाळिशीचा दहा वर्षांतील उच्चांक!

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 12:39AMनाशिक : रवींद्र आखाडे

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक आता चांगलेच तापू लागले असून, त्याचा प्रत्यय नाशिककरांना प्रकर्षाने येऊ लागला आहे. गेल्या 10 वर्षांपासून दरवर्षी एप्रिल महिन्यात नाशिकचे कमाल तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचतेच. मात्र, आजवर एप्रिलअखेरच्या टप्प्यात चाळिशीकडे वाटचाल करणार्‍या तापमानाने यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात चाळिशी पार केली आहे. गेल्या 10 वर्षांतील हा उच्चांक ठरला आहे. दिवसेंदिवस वाढणारे तापमान हे शहरासाठी धोक्याची घंटा ठरू शकते, असा इशाराच यातून नाशिककरांना मिळाला आहे.

थंड हवेसाठी महाबळेश्‍वरनंतर नाशिकचेच नाव घेतले जाते. नाशिकमधील वातावरणाच्या प्रेमात पडून मुंबई-पुण्यातील अनेकांनी नाशिकमध्ये सदनिका खरेदी करून ठेवल्या आहेत. उन्हाळा वा दिवाळीच्या सुट्ट्यांत केवळ वातावरण बदलासाठी या सदनिकांमध्ये राहण्यासाठी येणार्‍यांची संख्या कमी नाही. मात्र, आता नाशिकमध्येही टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. वृक्षतोड आणि सिमेंटचे जंगल वाढत चालल्याने शहराचे वातावरणही हळूहळू बदलू लागले असून, येथील उष्म्यात वाढ होत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, गेल्या 10 वर्षांपासूनच नाशिकच्या तापमानात वाढ होताना दिसते. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यातच तापमान चाळिशी ओलांडत आहे. सन 2008 पासून दरवर्षी एकट्या एप्रिल महिन्याच्या तिसर्‍या व शेवटच्या आठवड्यातच अशी परिस्थिती दिसून आलेली आहे. अपवाद म्हणून एखाद्या वर्षी दुसर्‍या आठवड्यात तापमान चाळिशीपर्यंत गेले आहे. मात्र, चाळिशी ओलांडण्यास तिसर्‍या आठवड्यानंतरच सुरुवात झालेली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये एकदाही एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने चाळिशी पार केलेली दिसत नाही. मात्र, यंदाच्या एप्रिलमध्ये पहिल्याच आठवड्यात म्हणजे बुधवारी (दि.4) तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. यातून पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 42.2 अंश हा आजवरचा विक्रम : सन 1958 मध्ये एप्रिल महिन्याच्या 24 तारखेला नाशिकचे सर्वोच्च कमाल तापमान 42.2 अंश इतके नोंदविण्यात आले होते.  कमाल तापमानाचा हा आकडा म्हणजे एप्रिलचा आजवरचा ऑल टाइम रेकॉर्ड मानला जातो. तर सन 2015 मध्ये एप्रिलच्या 15 तारखेला सर्वांत कमी कमाल तापमान 29.6 अंश इतके नोंदविले गेले होते.

अलीकडे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. सिमेंटचे जंगल वाढले आहे. यामुळे हवेतील धुलिकण कमी झाले आहे. परिणामी, आकाश निरभ्र राहत असल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत लंबरूप पडत हेत.तापमानवाढीचा संबंध सूर्याशी आहे; परंतु ग्लोबल वॉर्मिंगशी नाही. 22 मार्चला सूर्य विषवुवृत्तावर येतो, नंतर तो सरकत सरकत 22 जूनला कर्कवृत्तावर येतो. त्यामुळे उष्णता वाढत जाते आहे. तापमान स्थिर राहावे, यासाठी यावर उपाय म्हणून जास्तीत जास्त वृक्षलागवड हाच उपाय आहे. शिवाय तापमानाची ही स्थिती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, कोरड्या हवामानामुळे चटके लागत असून, उन्हापासून काळजी घेणे गरजेचे असल्याचे पुणे येथील हवामनशास्त्रज्ञ किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

Tags : Nashik, high, temperature, 10 years