Mon, Apr 22, 2019 15:37होमपेज › Nashik › नाशिकमध्ये संततधार

नाशिकमध्ये संततधार

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:42AMनाशिक : प्रतिनिधी 

काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे बुधवारी (दि.11) जिल्हा व शहर परिसरात आगमन झाले. शहरात दिवसभर संततधार सुरू होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात 22 मिमी, तर जिल्ह्यात 234 मिमी इतका पाऊस पडला. चार ते पाच तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे तेथील शेतकर्‍यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. मात्र, काही तालुक्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

कोकण, विदर्भात कोसळधार सुरू असली तरी उत्तर महाराष्ट्राला धुवाधार पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी नाशिक शहर व जिल्ह्यातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद ही पेठ तालुक्यात 69 मिमी इतकी केली गेली. त्या खालोखाल इगतपुरी तालुका 47 मिमी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात 45 मिमी इतका पाऊस पडला. मात्र, नांदगाव, मालेगाव, देवळा, चांदवड, निफाड या ठिकाणी पावसाने पाठ फिरवली. या तालुक्यांमध्ये शून्य मिमी पावसाची नोंद झाली.

तर बागलाण, कळवण, येवला, दिंडोरी तालुक्यांमध्ये पावसाचा नुसता  शिडकावा झाला. एकूणच जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली तेथील शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शेतकर्‍यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तर काही तालुक्यांना अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिक शहरातही मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी दिवसभर कधी मध्यम तर कधी रिमझिम सरी कोसळल्या. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले होते. शहराचा वेग मंदावला होता. त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात व गंगापूर धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (मिलीमीटरमध्ये)  ः नाशिक - 22, इगतपुरी - 47, त्र्यंबकेश्‍वर - 45, दिंडोरी - 7, पेठ - 69, निफाड - 0, सिन्नर - 3, चांदवड - 0, देवळा - 0, येवला - 1, नांदगाव - 0, मालेगाव - 0, बागलाण - 2, कळवण - 4, सुरगाणा - 34