Sun, Mar 24, 2019 11:06होमपेज › Nashik › अजून किती द्राक्ष उत्पादकांना देणार ‘तारीख पे तारीख’!

अजून किती द्राक्ष उत्पादकांना देणार ‘तारीख पे तारीख’!

Published On: Mar 11 2018 11:58PM | Last Updated: Mar 11 2018 10:47PMउगाव : वार्ताहर

नाशिक जिल्ह्याची द्राक्षपंढरी म्हणून नावारूपाला आलेल्या निफाड, उगाव परिसरातील द्राक्ष उत्पादकांना सुमारे सत्तर लाख  रुपयांना गंडविणारा कोलकात्याचा तारिक अन्वर हा व्यापारी पळून गेल्यामुळे वर्षभराच्या मेहनतीवर क्षणार्धात पाणी फिरले आहे. मात्र, यातून आता द्राक्ष उत्पादकांनी बोध घेत रोखीच्या व्यवहाराची मोहीम अधिक व्यापक करायला हवी. त्यातूनच फसवणूक टळणार आहे, अन्यथा द्राक्ष व्यापारासाठी येणारे असे कित्येक तारिक द्राक्ष उत्पादकांना ‘तारीख पे तारीख’ देऊन गंडवून जातील.

परप्रांतातून द्राक्ष व्यापारी नाशिक जिल्ह्यात दाखल व्हायचे. स्थानिक  एखाद्या बेरोजगाराला हाताशी धरून पायलट (व्यापार्‍याचा वाहनचालक) करायचे. त्याच्याच ओळखीने मजूर, वाहतूकदारांची व्यवस्था उभी करायची. तयार झालेल्या द्राक्षबागेत जाऊन अवघ्या दोन-पाच हजार रुपयांच्या विसारापोटी लाखोंचा द्राक्षमाल काढून बाजारपेठेत रवाना करायचा, असा नेहमीचा व्यापार द्राक्ष व्यापारी करीत आले. यात विशेष म्हणजे उधारीवर पाच, दहा लाखांचा द्राक्षमाल सहजासहजी उपलब्ध होतो अन् त्याच रकमेवर इतर शेतकर्‍यांनाही झुलवत ठेवता येते.

ही द्राक्ष व्यापार्‍यांची नेहमीची मानसिकता होऊन बसली. मग व्यापारात तोटा आला, पूर्ण पैसे देता येणार नाही, तुमचा द्राक्षमाल बाजारपेठेत जाईपर्यंत पाणी सोडत होता, त्याला बुरशी आली अशा एक ना अनेक सबबीखाली शेतकर्‍यांना पैसे देताना जेरीस आणत आले. घामाचे दाम मिळविताना व्यापार्‍याकडून कमिशनच्या नावाखाली दोन ते तीन टक्के कपातीचा फंडाही वापरला जात होता. अशा नाना कल्पनांतून द्राक्ष व्यापार्‍यांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी शिवडीकरांनी रचलेल्या ‘रोखीने द्राक्षमाल विकण्याचा अन् कोणतीही कपात न करणार्‍या व्यापार्‍यांशी व्यवहार करण्याचा’ एकमुखी ठराव केला.

जिल्ह्यातील सर्वच द्राक्ष उत्पादकांनी शिवडीकरांच्या रोखठोकीच्या पायावर कळस रचण्याची वेळ आली आहे. दरवर्षी ऑक्टोबर छाटणीपासून द्राक्ष उत्पादकांची तारेवरची कसरत सुरू होते. बेमोसमी पाऊस, वादळ, कडाक्याच्या थंडीची लाट,  संकटांच्या डोंगराला बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाची साथ लाभत जाते. यातून द्राक्षमाल सहीसलामत ठेवण्यासाठी  शेतकर्‍यांची अक्षरशः त्रेधातिरपीट होते. याच एकमेव वर्षभराच्या पिकात द्राक्ष उत्पादकाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, सोसायटी बँकांचे कर्ज, मुला-बाळांचे शिक्षण, कुटुंबातील आरोग्य, उधारी, उसनवारी अशा नानाविध अडचणींची सोडवणूक अवलंबून असते.

द्राक्षमाल तयार होताच परप्रांतातून आलेले द्राक्ष व्यापारी आपल्या वाक्चातुर्याने द्राक्ष उत्पादकांना भुरळ पाडतात. पहिल्यांदा रोखीची बोली होते, नंतर आजचे उद्या अन् उद्याचे परवा असे वायदे वाढत जातात. अचानकपणे एका रात्रीत पलायन करतात. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळेला द्राक्षमाल लुटल्यानंतर द्राक्ष उत्पादक पोलिसांत तक्रार करतात अन् पुढील कायदेशीर सोपस्कार पार पडतात. द्राक्ष उत्पादकांच्या श्रमाचा मोबदला मिळायला अडथळ्यांची मालिकाच उभी राहते, यावर कठोर उपाय प्रशासनाकडून होत नसल्याने दरवर्षीचा द्राक्ष उत्पादकांचा  फसवणुकीला अनुभव गाठीला आहे.