Mon, May 27, 2019 01:01होमपेज › Nashik › ‘आपले सरकार’चा फलक चक्‍क इंग्रजीत!

‘आपले सरकार’चा फलक चक्‍क इंग्रजीत!

Published On: May 19 2018 1:34AM | Last Updated: May 18 2018 11:55PMनाशिक : प्रतिनिधी

सरकारी कामकाजात राजभाषा मराठीचा वापर करण्याबाबतचा अध्यादेश असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शहरातील आपले सरकार सेवा केंद्रांची यादी चक्‍क इंग्रजी अक्षरात दिमाखात झळकत आहे. दैनंदिन शासकीय व्यवहारात मराठीची सक्ती असताना जिल्हा प्रशासनाची ही कृती म्हणजे सरकारच्या आदेशालाच हरताळ फासला आहे. 

राज्यातील सरकारी कार्यालयांमधील व्यवहारात सरकारने मराठी भाषा सक्तीची केली आहे. त्याबाबत 7 मे रोजी अध्यादेश काढण्यात आला आहे. दैनंदिन व्यवहारातील पत्रे, कार्यालयीन टिपण्णी, नोंदवह्या, नियमपुस्तिका इतकेच काय तर विविध शेरे, अधिसूचना, शासनाची धोरणे, अधिकार्‍यांची नावे आणि मंत्र्यांकडे पाठविण्यात येणारी पत्रेदेखील मराठीत असणे अनिवार्य आहे. तसेच सर्वसामान्यांशी निगडीत जनसुविधांसह इतर सर्व फलक हे मराठीत असणे बंधनकारक करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर डाव्या हातालाच शहरातील 83 आपले सरकार सेवा केंद्रांच्या यादीचा फलक दृष्टीस पडतो. यामध्ये केंद्राचे नाव, केंद्र चालकाचे नाव आणि पत्ता नमूद करण्यात आला आहे. परंतु, हा फलक चक्‍क इंग्रजीत आहे.  त्यामुळे ‘दिव्याखाली अंधार’ अशीच काहीशी प्रशासनाची परिस्थिती झाली आहे.

मुळातच प्रशासनाने सेतू कार्यालयांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शहरात आपले सरकार सेवा केंद्र सुरू केले. तसेच सेतू बंद करत या केंद्रांमधून दाखले वितरणाची सोय केली आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेत आणि ठरवून दिलेल्या शुल्कात दाखले उपलब्ध होणार आहे. मात्र, हे सर्व करताना प्रशासनाने केंद्रांची यादी इंग्रजीमध्ये दिली आहे. त्यामुळे दाखले काढण्यासाठी येणार्‍या सर्वसामान्यांची या फलकामुळे कोंडी होत आहे. दरम्यान, शासकीय कारभारात मराठी अनिवार्य केली जात असताना दुसरीकडे प्रशासनाच्या इंग्रजीच्या अट्टाहासामुळे एकप्रकारे जनतेमध्ये सरकारची नाच्चकी होत आहे.