होमपेज › Nashik › बारावीत मुलींचीच बाजी

बारावीत मुलींचीच बाजी

Published On: May 31 2018 1:43AM | Last Updated: May 30 2018 10:48PMनाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी (दि. 30) दुपारी 1 वाजता जाहीर झाला. नाशिक विभागाचा निकाल राज्यात सर्वांत कमी 86.13 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात 2 टक्क्यांनी घट झाली आहे. भरारी पथकांनी कॉपीबहाद्दरांवर केलेल्या कठोर कारवाईमुळे निकालात घट झाल्याचा दावा शिक्षण मंडळाकडून करण्यात आला. दरम्यान, यंदादेखील निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. 

दि. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांतील एकूण 1 लाख 60 हजार 284 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी 1 लाख 38 हजार 55 विद्यार्थी (86.13 टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी नाशिक विभागाचा निकाल 88.22 टक्के लागला होता. यंदा राज्यात सर्वांत कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. राज्यातील 9 विभागांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.85 टक्के इतका, तर त्या खालोखाल कोल्हापूर विभागाचा 91 टक्के निकाल लागला आहे.   

नाशिक विभागात धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 88.87 टक्के, त्या खालोखाल नाशिक जिल्ह्याचा 86.85 टक्के, नंदुरबार जिल्ह्याचा निकाल 84.70 टक्के, तर जळगाव जिल्ह्याचा निकाल 84.20 टक्के लागला आहे.  विभागात यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. विभागातील 91 हजार 47 प्रविष्ट मुलांपैकी 75 हजार 307 जण (82.71 टक्के) उत्तीर्ण झाले आहेत, तर 69 हजार 237 मुलींपैकी 62 हजार 748 मुली (90.63 टक्के) उत्तीर्ण झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांना येत्या 12 जून रोजी महाविद्यालयांत दुपारी 3 वाजता गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार असून, त्यानंतर पुढील प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी गुरुवारपासून (दि. 31 मे) अर्ज करता येणार आहे. अर्जाचा नमुना राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याची मुद्रित प्रत काढून अर्ज भरावा लागणार आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह दि. 31 मे ते 9 जूनपर्यंत विहित शुल्क भरून विद्यार्थ्यार्ंना अर्ज करता येणार आहे, तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी दि. 31 मे ते 19 जून या कालावधीत अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून 5 दिवसांत अर्ज करणे आवश्यक असल्याचे राज्य शिक्षण मंडळाने कळविले आहे.