त्र्यंबकेश्वर : वार्ताहर
त्र्यंबकेश्वर पोलीस हद्दीतील राजेवाडी येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न करणार्या पीडितेच्या कुटुंबीयांना समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिली असल्याने सरपंच व पोलीसपाटील यांच्यासह जातपंचायतीच्या 21 व्यक्तीं (पंचां)विरोधात शुक्रवारी (दि.9) त्र्यंबक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेवाडी येथे अल्पवयीन मुलीवर संशयित दिनकर येले (19) याने 23 जानेवारी रोजी अत्याचार केला. त्यानंतर केवळ जातपंचायतीच्या दबावातून झालेल्या अत्याचाराची घटना श्रमजीविचे भगवान मधे यांच्या पुढाकाराने उघडकीस आली. त्यानंतर बुधवारी (दि.7) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. अत्याचाराची घटना मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर गावात जातपंचायतीची बैठक बोलविण्यात आली. बैठकीत पंचांनी पीडित मुलीबरोबर संशयिताने लग्न करावे अथवा लग्न न केल्यास मुलीला नुकसानभरपाई म्हणून संशयिताच्या वडिलांच्या नावावर असलेली पाच एकर जमीन द्यावी, असा निर्णय दिला. दोन्ही कुटुंबीयांनी या निर्णयास संमती देत 100 रुपयांच्या मुद्रांकावर पंचांसमोर आप समजूत करारनामा करण्यात आला. त्यानंतर तो करारनामा पाडून टाका नाही तर समाजातून बहिष्कृत करू, अशी भूमिका जातपंचायतीने घेतल्याने अत्यंत गंभीर असलेल्या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.