Sat, Aug 24, 2019 21:29होमपेज › Nashik › नाशिक : सिन्नर-घोटी मार्गावर गॅस टँकर पेटला

नाशिक : सिन्नर-घोटी मार्गावर गॅस टँकर पेटला

Published On: Aug 06 2018 1:18PM | Last Updated: Aug 06 2018 1:26PMसिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर-घोटी मार्गावर पांढुर्ली शिवारात आज सकाळी सव्‍वा अकरा वाजता गॅस टँकरचा अपघात झाला. त्यानंतर टँकरने पेट घेतला. क्षणार्धात आगीचे लोळ आकाशात झेपाऊ लागल्याने परिसरात खळबळ उडाली.

पोलिस व अग्निशमन दलास माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दोन वाहनांमध्ये हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र टँकरने पेट घेतलेला असल्याने आग विझविण्याचे काम वेगात सुरु आहे. दुसरे वाहन कोणते किंवा या घटनेत जिवितहानी झाली किंवा काय याबाबत माहिती देण्यास पोलिसांकडून असमर्थता दर्शविली जात आहे.

घोटीकडून सिन्नरच्या दिशेने जाणारा एलपीजी टँकर व लोखंड भरुन सिन्नरकडून घोटीकडे जाणारा कंटेनर यांच्यात घोटीमार्गावर पांढुर्ली शिवारात कोळनाला येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात एक दुचाकीदेखील जळून खाक झाली. दुचाकीस्वाराने आपला जीव वाचवण्यासाठी दूर पळाल्याने जीव वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नाशिक महापालिका, सिन्नर नगरपालिका, एमआयडीसी सिन्नर व देवळाली कँटोन्मेंट बोर्ड यांचे पाच बंबांच्या मदतीने आग विझविण्याचे काम सुरु आहे.