Fri, Apr 19, 2019 12:19होमपेज › Nashik › नाशिक : पाठलाग करून सहा लाख पळविले (video)

नाशिक : पाठलाग करून सहा लाख पळविले (video)

Published On: Jan 30 2018 8:27PM | Last Updated: Jan 30 2018 8:27PMपंचवटी : देवानंद बैरागी

पंचवटी परिसरातील श्रीकृष्ण नगर येथे गॅस एजन्सीमधील कर्मचाऱ्याचा पाठलाग करून व त्याला मारहाण करून बँकेत भरण्यासाठी घेऊन जाणाऱ्या साडेसहा लाखाची रोख रक्कम दोघा संशयितांनी गाडीच्या डिक्कीतून काढून लुटल्याची घटना घडली आहे. भरदिवसा या लुटीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती. 

मंगळवार दि. ३० रोजी दुपारी सव्वा चार वाजता तपोवन कॉर्नर येथील एच. जोशी यांच्या गॅस गोडावूनमध्ये कॅशियर म्हणून  सतीश साळी काम करतात. ते नेहमीप्रमाणे दिवसभराची रक्‍कम सारस्वत बँकेत भरण्यासाठी आपली दुचाकी (क्र. एमएच १५- डीपी ५७८२) वरून जातात. तपोवन कॉर्नरकडून कृष्णनगर येथील श्रीकृष्ण गार्डनच्या पाठीमागील बाजूच्या रस्त्याने जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी साळी यांच्या दुचाकीला धक्‍का देऊन खाली पाडली. यावेळी साळी यांना मारहाण करून दुचाकीतील सहा लाख ४४ हजार रुपयांची बॅग काढून पोबारा केला. या लुटमारीच्या घटनेने साळी यांना धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  

ज्या परिसरात ही घटना घडली त्या परिसरातील काही दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यामध्ये चोरटे पाठलाग करतानाचे दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवून लूटमार केल्याचे स्पष्ट होत आहे. लूटमार करताना या संशयितांना पैशांची बॅग दुचाकीच्या डिक्कीत ठेवली असल्याचे माहित असल्याने त्यांनी मारहाण करून रोख रक्कम काढून घेत पोबारा केला आहे. 

लुटमारीच्या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, उपनिरीक्षक महेश इंगोले आदींसह गुन्हेशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची तपासणी केली आहे.