Wed, Apr 24, 2019 22:18होमपेज › Nashik › महामार्गावर लुटणारी टोळी जेरबंद

महामार्गावर लुटणारी टोळी जेरबंद

Published On: May 19 2018 1:34AM | Last Updated: May 18 2018 11:50PMजळगाव : प्रतिनिधी

सोलापूर-धुळे महामार्गावर कन्नड घाटातील दर्ग्याजवळ रस्त्यावर दगड आडवे लावून रस्ता लूट करणार्‍या टोळीला पोलिसांनी माहिती मिळताच धाव घेत मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून 21 हजार 950 रुपये रोख रक्कमेसह, तीन चाकू, शार्प कटर, आठ मास्क, 10 मोबाइल, चार मोटरसायकल असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक केलेले सर्वजण 18 ते 21 वयोगटांतील असून, यातील काही शिक्षण घेत असल्याचेही समोर आले आहे.

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वरील कन्नड घाटातील दर्ग्याजवळ रस्त्यावर दगड आडवे लावून चाकूचा धाक दाखवून जबरी लूट करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री 2 च्या सुमारास घडला. याची माहिती पोलिसांना मिळताच चाळीसगाव गामीण पोलिसांनी लागलीच धाव घेत गस्ती पथकाला सूचना दिली. त्यावेळी घटनास्थळावरून दोन संशयित नामे भागवत बाळू पाटील व अश्‍विन शांताराम चव्हाण हे दुचाकीवरून पळून जात असतानाच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना फिर्यादी व साक्षीदारासमोर उभे केले असता त्यांना फिर्यादीने ओळखले. त्यानंतर त्यांच्या कसून चौकशीनंतर चार पथके उर्वरित संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन दुचाकीवरून ट्रिपलशीट बसून पळून जात असलेले संशयित विष्णू रामलाल लोणारे, अंकुश रामचंद्र गांगुर्डे, हिरामण संजू सोनवणे, समाधान रामदास मस्के, गोकुळ युवराज सोनवणे, विष्णू देवानंद सोनवणे यांना प्रथम ताब्यात घेतले. त्यानंतर गौतम रणछोड पगारे, पुष्कर कैलास चौधरी यांना एका दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्या अंगझडतीत 21 हजार 950 रुपये, तीन चाकू, एक शॉर्प कटर, आठ मास्क, नऊ मोबाइलसह चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दरोडेखोरांमध्ये वकिलीचे शिक्षण घेणारा संशयित भागवत पाटील हा टोळीचा म्होरक्या असल्याचे समोर आले आहे. अन्य संशयित बारावीचे शिक्षण घेत आहेत, तर काही चालक आणि वीटभट्टीवर मजूर म्हणून कामास असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली.