Thu, Jul 18, 2019 22:07होमपेज › Nashik › गणेशोत्सव देखावे स्थलांतरास शिवसेनेचा विरोध

गणेशोत्सव देखावे स्थलांतरास शिवसेनेचा विरोध

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 12:54AMनाशिक : प्रतिनिधी

बी. डी. भालेकर मैदानावर गणोशोत्सव देखावे आणि आरास थाटण्यास परवानगी नाकारणार्‍या मनपा प्रशासनाला शिवसेना जाब विचारणार असून, प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? असे विचारण्याची वेळ आता आली असल्याचे विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले. सत्ताधारी भाजपाचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण नसल्यानेच नाशिककरांवर ही वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले. 

लोकमान्य टिळक यांनी घालून दिलेला आदर्श मानणार्‍या भाजपाच्या सत्तेतच नाशिकचा गणेशोत्सव हद्दपार होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. नाशिक शहराला सांस्कृतिक वारसा आहे. येथील सण उत्सवांना वेगळेपण आहे. यामुळे शहराची सामाजिक बांधिलकी टिकून आहे. परंतु, गणेशोत्सवासह धार्मिक परंपरांना छेद देऊन प्रशासन कायदा सुव्यवस्था बिघडवू पाहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शिवसेना कदापि खपवून घेणार नाही. शिवसेना स्टाइलने त्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा बोरस्ते यांनी प्रशासनाला दिला. बी. डी. भालेकर मैदानावर दरवर्षी परंपरेनुसार सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या आणि शहरातील गणेशोत्सव मंडळामार्फत आरास व देखावे उभारले जातात. त्यासाठी परवानगी घेण्यास गेलेल्या शिष्टमंडळाला मुंढे यांनी अपमानास्पद वागणूक देत बाहेरचा रस्ता दाखविला. यामुळे शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. त्यावर बोरस्ते यांनी प्रशासन तसेच सत्ताधारी भाजपावर टिकेची झोड उठविली. अनेक वर्षांपासून भालेकर मैदानावर आरास केली जाते. त्याबाबत कुठलीही पर्यायी व्यवस्था न देता गणेशोत्सवाच्या तोंडावर तुम्हीच तुमची जागा शोधा हे म्हणणे कितपत योग्य आहे. श्रीगणेशाचे आणि धार्मिकतेचे इतकेच वावडे असेल तर सिंहस्थासाठी येणारा निधी कसा चालतो असा प्रश्‍न बोरस्ते यांनी उपस्थित केला. उत्सव काही दिवसांचे असतात. त्यातही प्रशासन खोडा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा कृत्याचा आम्ही जाहीर निषेध नोंदवितो. परंपरेने सुरू असलेला उत्सव भालेकर मैदानावरच व्हावा यासाठी शिवसेना आग्रही राहिल आणि प्रसंगी शिवसेना स्टाइल आंदोलन करून प्रशासनाला धडा शिकवेल, असे ठणकावून सांगितले.