Mon, May 20, 2019 18:04होमपेज › Nashik › गणेशोत्सवातील अटींचे ‘विघ्न’ टळले

गणेशोत्सवातील अटींचे ‘विघ्न’ टळले

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 05 2018 2:13AMनाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवासंदर्भात मनपाकडून अटी शिथिल केल्या जात नसल्याने गणेशोत्सव महामंडळांनी निषेध मोर्चाचा पवित्रा घेतला होता. या मोर्चाचा धसका घेऊन मंगळवारी (दि.4) मनपा प्रशासन आणखी नरमले आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील विद्युत निरीक्षकाचा दाखला आणि अग्‍निशमन विभागाचे शुल्क देण्याची गरज नसल्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, सहाही विभागीय कार्यालयांत सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी  योजनेअंतर्गत मनपाचा बांधकाम विभाग आणि अग्निशमन विभागाचे दाखल तत्काळ गणेश मंडळांना देण्यात येणार आहे.  गेल्या महिन्याभरापासून गणेश मंडळे आणि मनपा प्रशासन यांच्यात विविध दाखल्यांची परवानगी आणि बी. डी. भालेकर मैदानावरील परवानगीवरून कलगीतुरा सुरू होता. यात खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घातल्यानंतरही प्रशासनाकडून गणेश मंडळांना दिलासा दिला जात नव्हता. यामुळे सोमवारी (दि.3) गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येत 5 सप्टेंबर रोजी निषेध मोर्चा आणि गणेशोत्सव साजरा न करता मनपा प्रशासन व शासनाच्या निषेधार्थ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चाच्या धास्तीने मनपाने गणेशोत्सव महामंडळाची मंगळवारी (दि.4) बैठक घेतली. मुख्य लेखाधिकारी तथा मिळकत व्यवस्थापक सुहास शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय झाले. गणेश मंडळांना शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत निरीक्षकाचा दाखला बंधनकारक करण्यात आले होते. तसेच अग्निशमन विभागाने मंडळांना प्रत्येक दिवसासाठी 500 रूपये शुल्क भरण्यास सांगितले होते. गणपती मंडळांनी मागील वर्षीप्रमाणे ज्या प्रमाणे मंडप टाकले होते त्यानुसार परवानगी देण्यात येणार असल्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी सांगितले.  बैठकीस आमदार देवयानी फरांदे, नगरसेवक गजानन शेलार, पद्माकर पाटील, कैलास मुदलीयार, रामसिंग बावरी, बबलूसिंग परदेशी, रमेश कडलग, देवांग जानी, सत्यम खंडाळे, गणेश बर्वे, बबलू शेलार, दिनेश चव्हाण, सचिन डोंगरे, लक्ष्मण धोत्रे, दिनेश कमोद, नंदन भास्करे, विजय बिरारी, अमर वझरे, नंदू कहार, विनोद थोरात, नंदु पवार, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.