Wed, Apr 24, 2019 15:55होमपेज › Nashik › जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

Published On: Sep 11 2018 1:54AM | Last Updated: Sep 10 2018 11:15PMनाशिक : प्रतिनिधी

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सक्रिय पाठिंबा मिळाल्यानंतरही शहरासह जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद लाभला. नाशिकमधील प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार वगळता वाहतूक, सरकारी, खासगी आस्थापनांवर या आंदोलनाचा कोणत्याही प्रकारचा परिणाम दिसून आला नाही. दुपारी तीनपर्यंत बससेवा बंद ठेवण्यात आल्याने महामंडळाला 60 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तोडफोड वा दगडफेकीची कोणतीही अप्रिय घटना बंदच्या काळात घडली नाही.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत असून, सर्वसामान्य जनतेचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. काँग्रेसने इंधन दरवाढीचा मुद्दा कॅश करण्यासाठी सोमवारी ङ्गभारत बंदफ ची हाक दिली होती. यासाठी अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनाही सोबत येण्याचे आवाहन करण्यात आले होते. नाशिकमध्ये काँग्रेसच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, डावे पक्ष या पक्षांची साथ मिळाली. सकाळी अकराला सीबीएस येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचा धसका घेऊन प्रमुख बाजारपेठांमधील व्यावसायिकांनी आधीच दुकाने बंद ठेवण्यास पसंती दिली. त्यामुळे कामगार हजर असले तरी शालिमार, शिवाजी रोड, टिळकपथ, महात्मा गांधी रस्ता, वकीलवाडी, रविवार कारंजा या प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने बंदच होती. दुपारपर्यंत शुकशुुकाट जाणवत होता. काही ठिकाणी अर्धवट शटर खाली करण्यात आले होते. नाशिकरोड, सातपूर, सिडको या  भागातही अशीच परिस्थिती दिसून आली. पंचवटीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून बससेवा बंद केली.

खबरदारीचा म्हणून दुपारी तीनपर्यंत शहर तसेच जिल्ह्यातील बससेवा बंद  ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहरातील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. संपूर्ण जिल्हाभरातील दीड हजार फेर्‍या रद्द करण्यात आल्याने साठ लाख रुपयांचे नुकसान महामंडळाला सोसावे लागले. दुसरीकडे शहरातील उपनगरांमध्ये बंदचा कोणताही परिणाम  जाणवला नाही. दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरळीत होते. रिक्षाचालक सहभागी न झाल्याने वाहतुकीवरही फारसा परिणाम दिसून आला नाही. सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा यासारख्या भागात रिक्षांचा गराडा नेहमीप्रमाणेच दिसून आला.  शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहनेही नित्यनेमाने सुरू असल्याने शाळांवरही बंदचा परिणाम दिसून आला नाही. सरकारी-निमसरकारी तसेच खासगी व्यवस्थापनाची कार्यालयेही सुरळीत सुरू होती म्हणजे, बंद इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आला असला तरी सामान्य जनतेचा यात सहभाग दिसून आला नाही.