Fri, Apr 19, 2019 12:24होमपेज › Nashik › वसिमच्या समयसुचकतेने टळली राईनपाडाची पुनरावृत्ती

वसिमच्या समयसुचकतेने टळली राईनपाडाची पुनरावृत्ती

Published On: Jul 02 2018 4:45PM | Last Updated: Jul 02 2018 4:45PMमालेगाव : सुदर्शन पगार

मुले पळविणारी टोळी असल्याच्या संशयातून जमावाच्या हल्ल्यात पाच जणांचा निर्घृण खून झाल्याच्या राईनपाडा (ता. साक्री) घटनेला बारा तास उलटत नाही तोपर्यंतच या घटनेची पुनरावृत्ती मालेगावात घडता-घडता सुदैवाने टळली. फळविक्रेत्या युवकाची समयसुचकतेने पुढील अनर्थ टळला. 

राईनपाडा गावातील आठवडे बाजारात रविवारी दुपारी 12 वाजता दाखल झालेल्या पाच भिक्षेकर्‍यांना जमावाने ठेचून मारले. नाथपंथी डवरी समाजातील ‘त्या’ व्यक्तींना मुले चोरणारी टोळी समजून ही घटना घडल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियावरील या अशाच अफवांचे लोण मालेगावामध्येही पसरले आहे. त्यातूनच परभणी तालुक्यातील वडी (ता. जिंतूर) येथील गवळी समाजाच्या लोकांवर हल्ला झाल्याचा प्रकार अली अकबर दवाखान्याजवळ घडला. गजानन साहेबराव गिर्‍हे (27) हे पत्नी सिंधुबाई (27) व अडीच वर्षाचा मुलगा गौरव याच्यासमवेत मूळगावी परत जाण्यासाठी पैसे नसल्याने भीक मागत होते. त्यांना पाहून काहींनी ते मुल पळविणारे असल्याचा संशय व्यक्त केला. 

चर्वितचवर्णातून संशयाचे ढग गडद होऊन काहींनी त्यांना थेट हे मुल पळविणारेच असल्याचा आरोप करत गजाननला घेरले. अहमद बीन अकमर मशिदीसमोर गजाननला मारहाण सुरू झाली. घटनेचा अंदाज येऊन फळविक्रेता शेख वसिम शेख करिम (32) याने समयसुचकता दाखवत गिर्‍हे कुटुबियांना आपले कामा रशीद राशनवाले यांच्या तीन मजली घरात घुसविले. तोपर्यंत घटना समजताच मोठा जमाव घराबाहेर जमा झाला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांची एक तुकडीही जमावापुढे निष्प्रभ ठरून तेही त्या घरात आश्रयाला गेले.

माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजवू देण्याचा आवाहन केले. परंतू, संशयाने बेफाम झालेल्या जमाव काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यातून दगडफेक सुरू झाली. राशनवाला कुटुंब प्रचंड दबावाखाली येऊनही त्यांनी मोठ्या हिंमतीने संयम राखला. अखेर अपर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले हे मोठ्या बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वीअनियंमित जमावाने पोलिसांची एक व्हॅन (ज्यात पोलिस कर्मचारी बसले होते) व पोलिसांनी दुचाकी उलटली होती. ते दाम्पत्य घराबाहेर काढावे, या हेतूने जमावाचा हैदोस सुरू असूनही राशनवाला कुटुबियांनी त्यांना आधार दिला.

दहा वाजेपासून सुरू झालेला हा प्रकार मध्यरात्र उलटूनही संपण्याचे नाव घेत नसल्याचे पाहून अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव पांगवला. तत्काळ गिर्‍हे कुटुंबाला बाहेर काढून प्रथम पोलिस नियंत्रण कक्ष व नंतर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कॅम्प पोलिस ठाण्यात रवाना केले. तेव्हा वातावरण शांत झाले. दरम्यान याप्रकरणी हल्ल्यातील जखमी गिर्‍हे व पोलिसांनीदेखील आझादनगर पोलिस ठाण्यात जमावाविरोधात फिर्याद नोंदवली आहे. 

तोंडओळख आली कामी
मुले चोरणारी टोळीचा संशय व्यक्त झालेले गिर्‍हे कुटुंबाने आझादनगर पोलिस ठाण्याला दिलेल्या फिर्यादीत मूळगावी परत जाण्यासाठी पैसे नसल्याने भीक मागत असल्याचे सांगितले आहे. ते काही दिवसांपासून शहरात वावरत होते. त्यांनी फळविक्रेता शेख वसीमकडूनदेखील दोन-तीन वेळा भीक घेतली होती. जमावाने हल्ला केला तेव्हा वसीम तेथेच होता, त्याने त्यांना ओळखले. ते भिकारीच आहेत, मुल पळविणारे नाहीत, अशी त्याची खात्री असल्याने वसीम त्यांच्या बचावासाठी पुढे धजावला. अन्यथा जमावाच्या मारहाणीतून निश्‍चितच ‘राईनपाडा’ घटनेची पुनरावृत्ती झाली असते, असे सूत्रांनी सांगितले. त्यास अपर पोलिस अधीक्षकांनीदेखील पुष्टी दिली. विशेष म्हणजे, गिर्‍हे यांच्यावर हल्ला झाला तेव्हा बाजुच्या गल्लीत त्याची बहिण अनुसया विजय वाणी (40) व भाचा योगेश विजय वाणी (16) हे भीक मागत होते. काही लोकांनी त्यांना आफरिन सायजिंगमध्ये घेऊन आश्रय दिला. त्यामुळे तेही बचावू शकले. 

अफवेवर स्वार होऊन जमाव स्फोटक झालेला असताना माणुसकीचा प्रत्यय देणारी घटनादेखील घडली. रशीद राशनवाला कुटुंबियांनी त्या कुटुंबाला आणि मदतीसाठी आलेल्या परंतू जमावाच्या गराड्यात अडकलेल्या पोलिसांना आश्रय दिला. जीव आणि संपत्तीची पर्वा न करता त्यांनी माणुसकीचा धर्म निभावला. त्यांच्या हिंमतीला पोलिस प्रशासनातर्फे सलाम.

- हर्ष पोद्दार,  अपर पोलिस अधीक्षक, मालेगाव