Sat, May 30, 2020 13:45होमपेज › Nashik › नाशिक : उत्तर प्रदेशकडे नागरिकांना घेऊन जाणारे सहा कंटेनर- ट्रक पोलिसांनी केले जप्त 

नाशिक : उत्तर प्रदेशकडे नागरिकांना घेऊन जाणारे सहा कंटेनर- ट्रक पोलिसांनी केले जप्त 

Last Updated: Mar 30 2020 10:39AM

सिडको : महामार्गावर अवैध वाहतूक करणारे कंटेनर व ट्रकमधील प्रवाशी व चौकशी करणारे पोलिस अधिकारी.सिडको : पुढारी वृत्तसेवा

राज्यात लॉकडाऊन झाल्याने नागरिकांचे जथ्थ्येच्या जथ्थे आपआपल्या गावी जात आहेत. वाहतूक व्यवस्था काही नसल्याने त्यांना पायीच जावे लागत आहे. तर काही लोक दाटीवाटीने मिळेल त्या वाहनात बसून जीवघेणा प्रवास करत आहेत. दरम्यान सिडको येथील विल्होळी नाका येथे अंबड पोलिसांनी उत्तर प्रदेशकडे अवैधरित्या नागरिकांना घेऊन जाणारे सहा कंटेनर व ट्रक पहाटे जप्त केले आहेत. त्यातील ५५७ परप्रांतीयांना ताब्यात घेतले असून सहा ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या परप्रांतियांची मनपाने तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहिर केले. तसेच राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे सर्वत्र बंद आहे.  उत्तर प्रदेशातील मजूर कामानिमित्त मुंबई भागात आहेत. या मजुरांना गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. रेल्वे व बस बंद आहेत. या भागातील नागरिकांनी कंटेनर व ट्रक याच्या माध्यमातुन जाण्याचा निर्णय घेतला. भिंवंडी, कल्याण, उल्हासनगर या भागातील परप्रांतिय नागरिक सोमवारी रात्री दोन ट्रक, दोन कंटेनर, टेम्पो आणि दोन आयशर या वाहनातून उत्तर प्रदेशकडे निघाले होते. त्यावेळी नाशकात विल्होळी नाका येथे अंबड पोलिसांनी नाका बंदी केली होती. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता ही वाहने नाशिकचे प्रवेशद्वार विल्होळी नाका येथे आली. तेव्हा अंबड पोलिसांनी वाहने थांबवून तपासली, या वेळी वाहनात नागरिक प्रवास करताना आढळले. या नंतर सहाही वाहनातील नागरिकांना एका ठिकाणी एकत्रीत केले. याची माहिती मिळताच पोलिस उपायुकत विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी, अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक माईनकर, आरोग्य अधिकारी डॉ. छाया सांळुंखे, प्रांत श्रीकुमार आशिर्वाद, तहसिलदार दवंडे, मनपा सिडको विभागीय आधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

त्यानंतर डॉ. छाया साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सहा वाहनातील परप्रांतिय नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना सुरक्षितस्थळी विल्होळी शिवारातील बजरंगवाडी येथील सुखदेव आश्रमशाळेत २९१, अंबड येथील मनपा शाळेत ६७ आणि नाशकातील नासर्डी नदी लगत असलेल्या समाज कल्याण खात्याच्या वसतीगृहात ३०० परप्रांतिय नागरिकांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली आहे. येथे त्यांना ठेवण्यात आले आहे. 

अवैध वाहतूक केल्या प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा ट्रक व कंटेनर चालक परवेज अली, जयपॉल रॉय, राजभोर, अमोल धिवरे यांच्यासह सहा चालकांवर गुन्हा दाखल करून अटक करत ट्रक, कंटेनर व टेम्पो जप्त करण्यात आली आहेत.

पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पोलिस निरीक्षक कमलाकर चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, पोलिस उप निरीक्षक राकेश शेवाळे, संजय जाधव करीत आहे.