Wed, Mar 27, 2019 02:34होमपेज › Nashik › मित्राची बायको प्रियकराशी बोलली अन् प्रेयसीने नदीपात्रात उडी घेतली!

मित्राची बायको प्रियकराशी बोलली अन् प्रेयसीने नदीपात्रात उडी घेतली!

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 11:02PMपंचवटी : वार्ताहर 

प्रियकर त्याच्या मित्राच्या बायकोशी फोनवर बोलल्याच्या किरकोळ कारणावरून संताप व्यक्‍त करून प्रेयसीने थेट पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. दैव बलवत्तर म्हणून या महाविद्यालयीन युवतीचे प्राण वाचले आहे. बुधवारी (दि.14) दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील कन्नमवार पुलाला समांतर बांधण्यात आलेल्या पुलाजवळ ही घटना घडली.

नुकत्याच बांधण्यात आलेल्या या पुलाजवळून कॉलेज सुटल्यामुळे काही महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या पुलावरून जात होते. यामध्ये एक प्रेमीयुगुलदेखील होते. या दोघांमध्ये काहीतरी किरकोळ वाद सुरू होता. वाद सुरू असतानाच खरे खोटे करण्यासाठी प्रियकराने आपल्या मोबाइलवरून मित्राच्या मोबाइलवर कॉल केला. त्याचा मित्र आंघोळ करीत असल्याने त्याच्या पत्नीने कॉल उचलला आणि दोघे मोबाइलवर बोलले. मित्राच्या पत्नीशी बोलल्याच्या कारणावरून प्रेयसीने प्रियकराशी वाद घातला. या दोघांमध्ये भांडण सुरू झाले. त्यामध्ये प्रथम प्रियकराने आपल्या हातावर ब्लेडने वार करून घेतले, तर प्रेयसीने पुलावरून पाण्यात उडी मारण्याची धमकी दिली. बोलता बोलता प्रेयसीने थेट पुलावरून गोदावरी नदीपात्रात उडी मारली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पाहून या दोघांच्या मित्र आणि मैत्रिणींनी धूम ठोकली. 

कन्नमवार पुलालगत नव्या पुलाच्या उभारणीच्या कामासाठी नदीपात्रातील पाणी आटविण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी कमी आणि चिखल जास्त झाला आहे. या मुलीने पाण्यात उडी घेतली खरी; मात्र ती नेमकी या चिखलातच पडली. बाजूलाच मोठा खडकही होता. पुलावरून उडी मारल्याचा आवाज झाल्याने या ठिकाणी नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करणार्‍या मजुरांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नदीपात्रातून या मुलीला बाहेर काढून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रेमीयुगुलांना ताब्यात घेत त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.