Tue, Nov 20, 2018 20:08होमपेज › Nashik › वावीत तरुणीशी लगट; भोंदूबाबाचा पर्दाफाश 

वावीत तरुणीशी लगट; भोंदूबाबाचा पर्दाफाश 

Published On: Apr 19 2018 1:36AM | Last Updated: Apr 19 2018 7:41AMवावी: वार्ताहर

सिन्‍नर तालुक्यातील कणकोरी येथे अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून तरुणीशी लगट करणार्‍या भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला आहे. चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथून भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांच्या मुसक्या वावी पोलिसांनी आवळल्या.

नशिबात विधावा योग असल्याचे सांगून भोंदूबाबा मंगेश सुभाष पगारे (रा. मंगरूळ, ता. चांदवड, जि. नाशिक) यांने पीडित तरुणीसोबत वारंवार अंगलट करण्याचा प्रयत्न केला. संबंधित भोंदूबाबा नोव्हेंबर 17 ते एप्रिल 18 या कालावधीत पीडित तरुणीच्या घरीच वास्तव्यास होता. या कालावधीत अनेकदा भोंदूबाबाने पीडित तरुणीशी जवळीक साधून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध केल्यास पिस्तूलचा धाक दाखवून मारण्याची धमकीही भोंदूबाबा देत होता.

हा प्रकार पीडितेच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भोंदूबाबाला  घरातून हाकलून दिले. मात्र, भोंदूबाबाने कुर्‍हाडीने स्वत:च्या अंगावर वार करून  घेत  पीडितेच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या पीडितेने वावी पोलीस ठाण्यात भोंदूबाबाविरोधात तक्रार दिली. 

दरम्यान, भोंदूबाबासह त्याचे साथीदार युवराज दिनकर निरभवणे व खंडू दिनकर निरभवणे यांनी पीडित युवतीचे विवाह वारंवार मोडले. तसेच  विवाह केल्यास संबंधित वराला फोन वरून धमकविण्याचे कामही भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे तपास करत आहेत.