Tue, Apr 23, 2019 14:16होमपेज › Nashik › जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष थोरे यांची खून प्रकरणात निर्दोष मुक्तता

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष थोरे यांची खून प्रकरणात निर्दोष मुक्तता

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 05 2018 11:51PMनाशिक :  प्रतिनिधी

विंचूर येथे राजकीय वादातून 2008 साली प्रतिस्पर्धी गटावर गोळीबार करून एकाचा खून केल्याच्या आरोपातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्यासह 9 जणांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्‍तता झाली. निफाड तालुक्यातील विंचूर येथील तीनपाटी चौकात 7 मार्च 2008 रोजी ही घटना घडली होती. या चौकातील अतिक्रमण काढण्यावरून दरेकर आणि थोरे कुटुंबियांत वाद झाला होता. यावेळी दोन्ही कुटूंबियांमध्ये हाणामारी झाली.

या दरम्यान पंढरीनाथ थोरे यांनी परवाना असलेल्या पिस्तुलीतून रामदास कारभारी दरेकर यांच्यावर 10 फुटांवरून गोळ्या झाडल्या. त्यात दरेकर यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर दरेकर कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ, तोडफोड करत थोरे व इतरांना मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी दोन्ही गटातील व्यक्तींविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरेकर खून खटल्याची सुनावणी निफाड न्यायालयात सुरु होती. या खटल्यात थोरे यांच्या वतीने अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी काम पाहिले.

सरकारी वकिलांनी सुमारे 54 साक्षीदार तपासले. परंतु पोलीस व सरकारपक्ष थोरेंविरोधात ठोस पुरावे सादर करू न शकल्याने तसेच अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण करणार्‍या नोंदी आढळल्याने न्यायालयाने सक्षम पुराव्यांअभावी पंढरीना थोरे यांच्यासह 9 जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्‍तता केली. तर थोरे गटावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप असलेले मधुकर दरेकर यांच्यासह 6 जणांची न्यायालयाने  पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली आहे.