होमपेज › Nashik › उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे पहिले खासदार गोडसे यांचे निधन

उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे पहिले खासदार गोडसे यांचे निधन

Published On: Aug 17 2018 8:21PM | Last Updated: Aug 17 2018 8:21PMनाशिक : वार्ताहर

उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे वयाच्या ५९ वर्षी नाशिकच्या अपोलो रुग्णालयात निधन झाले. आज (दि.१७) सायंकाळी ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. अनेक वर्षापासून विविध शारीरिक व्याधींनी ते त्रस्त होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर  शनिवारी (१८ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता संसरी या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

१९९६ ते १९९८ साली शिवसेनेचे खासदार म्हणून त्यांनी काम केले. माजी खासदार गोडसे यांनी १० वर्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून काम पहिले होते. १९८० च्या दशकात शिवसेनेचे पहिले सरपंच म्हणून त्यांना निवडून येण्याचा बहुमान मिळाला. पंचायत समिती सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. जिल्हा प्रमुख पदाच्या काळात त्यांनी नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या १३०० शाखा उघडल्या होत्या. त्यांच्या जिल्हा प्रमुख कार्यकालात एकही राजकीय दंगल झाली नाही. काही दिवस छगन भुजबळ आणि राजाभाऊ गोडसे यांनी एकत्र कामे केली होती. 

उत्तर महाराष्ट्राचे शिवसेनेचे चौथे अधिवेशन नाशिकला झाल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी ‘बये दार उघड’ अशी साद नाशिककरांना घातली होती. त्यानंतर १९९५ साली नाशिककरांनी राजाभाऊ गोडसे यांना खासदार केले. मीनाताई ठाकरे त्यांना मुलगा मानत असत बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांचा उल्‍लेख नाशिकचा वाघ असा केला होता. शिवसेनेला अभिप्रेत असणार्‍या विचारसरणीनुसार ते वागत होते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात त्यांचा नावलौकिक होता. मध्यंतरीच्या काळात त्यांनी काही काळ महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे कास धरली होती.