Sat, Apr 20, 2019 17:52होमपेज › Nashik › हाणामारीमुळे मतदानाला गालबोट

हाणामारीमुळे मतदानाला गालबोट

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 11:10PMनाशिक : प्रतिनिधी

‘लक्ष्मी’दर्शनामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी (दि.25) तब्बल विक्रमी 92.30  टक्के इतके मतदान झाले. दिवसभर पाऊस सुरू असतानाही मतदानासाठी शिक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी शिवसेना पुरस्कृत उमेदवार दराडे व शिक्षक संघटनेचे उमेदवार बेडसे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे मतदानाला गालबोट लागले. मात्र, हा अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. विभागात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 95.8 टक्के इतके  मतदानाची नोंद झाली. दरम्यान, गुरुवारी (दि.28) मतमोजणी होणार असून, शिक्षकांचा आमदार शिक्षक होणार की संस्थाचालक याचा फैसला होईल.

उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या नाशिक विभाग शिक्षक (पान 1 वरून) मतदारसंघ निवडणुकीतील 16 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. उमेदवारांच्या साम, दाम, दंड, भेदच्या नीतीमुळे निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. विभागात नाशिकसह, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्यांत 94 मतदान केंद्रे होती. तर शिक्षक मतदारांची संख्या ही 53 हजार 335 इतकी होती. सोमवारी सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. तब्बल 59 हजार शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्यांदाच शिक्षक मतदारसंघासाठी 92.30 टक्के इतके  रेकॉर्ड ब्रेक मतदान झाल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. नाशिक शहरात बी. डी. भालेकर मैदान हे एकमेव मतदान केंद्र होते. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही मतदानावर परिणाम जाणवला नाही. 

मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी शिक्षकांच्या रांगा लागल्या होत्या.  नाशिकसह इतर विभागातील इतर जिल्ह्यातही भरघोस मतदान झाले. सर्वांत अधिक मतदान हे नंदुरबार जिल्ह्यात 95.8 टक्के इतके झाले. त्या खालोखाल नंदुरबार व नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. नाशिकमध्ये देखील मतदानासाठी शिक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शिक्षकांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी शिक्षकांच्या रांगा लागल्या होत्या. पाऊस पडत असताना छत्री घेऊन, रेनकोट घालून शिक्षक मतदानासाठी हजर होते. मतदानावेळी गोंधळ होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. सकाळी शिवसेना पुरस्कृत उमेदवार दराडे व शिक्षक संघटनेचे उमेदवार बेडसे यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. हा अपवाद वगळता दिवसभर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी व त्यांचे समर्थक यामुळे बी. डी. भालेकर शाळा परिसरात मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, 16 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही आठ उमेदवारांमध्ये होती. शिक्षक कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.