Sun, May 19, 2019 22:04होमपेज › Nashik › संजय टेन्शनमध्ये असायचे, मी त्यांना धीर द्यायची!

संजय टेन्शनमध्ये असायचे, मी त्यांना धीर द्यायची!

Published On: Aug 03 2018 1:36AM | Last Updated: Aug 02 2018 11:17PMनाशिक : प्रतिनिधी

दोन महिन्यांपासून ते मनपातील कामकाजामुळे टेन्शनमध्येच असायचे. दररोज घरी उशिरा आल्यानंतरही ते तणावातच दिसत. मी त्यांना धीर द्यायचे. व्हीआरएस घ्या, असे सांगितले देखील होते परंतु, व्हीआरएस घेतला तर मुलांचे भविष्य आणि शिक्षणाचे काय होईल, असा विचार करून ते पुन्हा कामावर जायचे. असे महापौर रंजना भानसी यांना सांगताना  मनपाचे सहायक अधीक्षक संजय धारणकर यांच्या पत्नी योगिता यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यांची कैफियत ऐकून महापौर भानसी यांनाही गहिवरून आले.

गेल्या 28 वर्षांपासून महापालिकेत विविध विभागात सेवा बजावलेल्या धारणकर यांनी हे जग सोडले, यावर गंगापूरोडवरील मधुमंगलनगरमधील ऋषीराज पार्क परिसरातील नागरिकांचा विश्‍वासच बसेना. अतिशय मितभाषी आणि कधीही कुणाच्या अध्यातमध्यात न पडलेल्या संजय धारणकर यांच्याविषयी रहिवाशी आस्थेने बोलत होते. महापालिकेतील अतिरिक्‍त ताणामुळे  दोन महिन्यांपासून ते अतिशय तणावात होते. कामाच्या तणावामुळे महापालिकेतून ते रात्री साडेसात आठला घरी येत. जून महिन्यात त्यांनी बारा ते पंधरा दिवसांची रजा घेतली होती. त्यानंतर ते 24 जून रोजी पुन्हा कामावर हजर झाले. काही दिवस काम केल्यानंतर ते पुन्हा काही दिवस रजा घेऊन घरी राहिले. कामाच्या ताणामुळे कामावर जाऊच वाटत नाही. असे त्यांनी पत्नी योगिताला सांगितले होते. यामुळे कामाचा ताण असेल तर व्हीआरएस घ्या, असे सांगत योगिता यांनी त्यांना धीर देण्याचे काम केले. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. गुरूवारी (दि.2) सकाळी संजय यांना कामावर जायचे म्हणून योगिता यांनी टिफीन तयार केला. परंतु, आज कामावर जात नाही. तू तुझे काम आवर असे सांगून ते खोलीत गेले. यामुळे योगिता या सकाळी साडेदहा पावणे अकराच्या सुमारास उदयनगर येथील स्वामी समर्थ केंद्रात पूजाविधीसाठी गेल्या आणि परतल्या तर त्यांना धक्‍काच बसला. 

पत्नीकडे दिले वेतन

आत्महत्या करण्याबाबत संजय यांनी जणू आधीच ठरविलेच होते. यामुळेच त्यांनी पत्नी योगिता यांना तू देवपूजेला जा, असे सांगितले होते. तसेच त्यांनी दोन महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम योगिता यांच्याकडे दिले होते. काही दिवस रजा घेऊन आराम केल्यानंतर बुधवारी (दि.1) त्यांनी कामावर हजेरी लावली. 

सहकार्‍यांबरोबर रात्री आठपर्यंत काम केल्यानंतर ते घरी परतले. दुसर्‍या दिवशी कामावर जाणार म्हणून योगिता यांनी जेवण बनवून त्यांना डबा तयार आहे, असे सांगितले. मात्र त्यांनी मी आज कामावर जाणार नाही सुट्टीच घेतो असे सांगून संजय धारणकर यांनी या जगाची  कायमचीच सुट्टी घेतली ती कधीही परत येण्यासाठीच!