Sun, May 26, 2019 21:23होमपेज › Nashik › तिघा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

तिघा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 11:39PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जिल्ह्यात सोमवारी (दि. 21) 100 टक्के मतदान झाले. शिवसेनेचे नरेंद्र दराडे, राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे आणि अपक्ष परवेझ कोकणी यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सहाणे व दराडे या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या गुरूवारी (दि. 24) मतमोजणी होणार आहे. 

जिल्ह्यातील पंधरा केंद्रांवर सकाळी 8 वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. प्रारंभीच्या काळात सर्वच केंद्रांवर मतदारांचा काहीसा कमी प्रतिसाद लाभला. मात्र, दुपारच्या सत्रात मतदानाच्या टक्क्यात वाढ झाली. जिल्ह्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर 160 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. नाशिक मनपा व भगूर नगरपालिकेतील सेनेच्या सदस्यांनी दुपारी पाउण वाजता मतदान केले. त्यापाठोपाठ भाजपाच्या सदस्यांनी दुपारी सव्वा एकला एकत्रित येऊन मतदान केले. काँग्रेस, मनसे व राष्ट्रवादीचे सदस्य अडीच वाजता केंद्रावर दाखल झाले. दरम्यान, आरपीआयच्या दीक्षा लोंढे यांनी दुपारी साडेतीन वाजता सर्वात शेवटी मतदानाचा हक्‍क बजावला. 

मालेगावमध्ये मतदानाची वेळ संपण्याच्या पाच मिनिटांपूर्वी मनपातील नगरसेविकेने मतदान केले. दरम्यान, निवडणुकीत जिल्ह्यात 100 टक्के मतदान झाले असून, यामध्ये 320 पुरूष तर 324 महिला मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. मतदान प्रक्रियेवेळी दगाफटका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी, भाजपा व सेना या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी ठाण मांडून होते.  सायंकाळी 7.30 वाजता सर्वात शेवटी येवला व नांदगावची मतदान पेटी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली.

मालेगावची जबाबदारी भुसेंवर!

नाशिकनंतर सर्वाधिक मतदान हे मालेगाव तालुक्यात होते. तेथे 97 मतदार होते. त्यामुळे सेनेने तेथील पक्षाच्या सदस्यांची जबाबदारी राज्यमंत्री दादा भुसे यांच्यावर सोपविली होती. भुसे हे देखील बारीक-सारीक गोष्टींवर नजर ठेऊन होते. दुसरीकडे दगाफटका टाळण्यासाठी राष्ट्रवादीने थेट पक्षाचे नेते नवाब मलिक यांनाच मालेगावमध्ये पाचारण केले होते. दरम्यान, तालुक्यातील मुस्लिम समाजाची मतदारांची अधिकची संख्या बघता अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांनीदेखील मालेगाववरच लक्ष केंद्रीत केले होते. 

लाइव्ह टेलिकास्ट

जिल्हा प्रशासनाने पंधराही मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. या कॅमेर्‍यांचे नियंत्रण खुद्द जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या दालनात होते. निवडणूक निरीक्षक पराग जैन, जिल्हाधिकारी व इतर अधिकार्‍यांना याठिकाणी बसून जिल्ह्यातील पंधराही मतदान केंद्रांवरील लाइव्ह टेलिकास्ट पाहता आले. त्यामुळे एकूणच मतदान प्रक्रिया सुरळीत व शांतेतत पार पडण्यास मदत झाली.