Wed, Mar 27, 2019 06:14होमपेज › Nashik › कोट्यवधींची उलाढाल झाली ठप्प

कोट्यवधींची उलाढाल झाली ठप्प

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:50PMपंचवटी : वार्ताहर

शेतकर्‍यांनी 1 जूनपासून सुरू केलेल्या आंदोलनाचा फटका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला आहे. बाजार समितीमध्ये जवळपास 70 टक्के भाजीपाला आणि फळभाज्यांची आवक घटल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे तर मुंबईकडे भाजीपाला घेऊन फक्त दहा वाहने गेली. त्यामुळे पहिल्याच दिवशी सुमारे चार कोटींची उलाढाल मंदावली. या आंदोलनाचा परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आला आहे.

शुक्रवार (दि.1) पासून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला नसला तरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्याचा मोठा परिणाम दिसून आला. यामध्ये शुक्रवारी भाजीपाला आणि फळभाज्यांची आवक 70 टक्के कमी झाल्याचे दिसून आले. बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्याने भाजीपाल्याला दर देखील चांगला मिळाला. तसेच, मुंबईला नाशिकहून सर्वसामान्य दिवसात जवळपास 35 ते 40 ट्रक भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. मात्र, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकडे फक्त 12 ते 15 वाहने गेली तीदेखील संपूर्ण न भरता जसा भाजीपाला उपलब्ध झाला त्या पद्धतीने पाठविण्यात आला. दरम्यान, सुरू झालेल्या आंदोलनाला दिवसभरात जिल्ह्यात कुठेही गालबोट लागले नसल्याने शनिवारी (दि.2) बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

शेतकरी आंदोलन 10 जूनपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे अशाच पद्धतीने शेतकर्‍यांनी बाजार समितीमध्ये आपला शेतमाल आणणे बंद केल्यास त्याचा सर्वसामान्य जनतेवर मोठा परिणाम होणार असून, भाजीपाल्याचे दर किरकोळ बाजारात गगनाला भिडणार असल्याचेदेखील तर्कवितर्क सुरू झाले आहे .