Wed, Apr 24, 2019 07:51होमपेज › Nashik › शेतकरी लढा तीव्र करणार

शेतकरी लढा तीव्र करणार

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:53PMनाशिक : प्रतिनिधी 

सुट्टीनंतर बाजार समित्यांचे कामकाज सोमवारी (दि.4) पोलीस बंदोबस्तात नियमित सुरू झाले. शेतकर्‍यांनी त्यांचा शेतमाल बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणल्याने आवक चांगली होती. दरम्यान, राष्ट्रीय किसान महासंघाने मंगळवारपासून (दि. 5) संप अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गरज पडल्यास भाजीपाल्याची वाहने पोलीस बंदोबस्तात मुंबई, गुजरातकडे रवाना करण्यात येतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

देशभरात शेतकरी कर्जमुक्ती तसेच हमीभावासाठी पुकारण्यात आलेल्या संपाचे पडसाद सोमवारी जिल्ह्यात काहीसे कमी झाल्याचे चित्र होते. नाशिकसह मालेगाव, पिंपळगाव-बसवंत, घोटी या बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची व फळांची आवक चांगली होती. तर लासलगाव बाजार समितीत आवक झाली नसली तरी कांदा व भुसार मालाचे लिलाव मात्र, सुरळीत सुरू होते. दरम्यान, नाशिक बाजार समितीत दिवसभरात सहा हजार 445 क्विंटल भाजीपाला व फळांची आवक झाली. तर मालेगावमध्ये एक हजार 420 तसेच घोटीत 312 व पिंपळगाव बसवंत 312 क्विंटल एवढी आवक झाली. दिंडोरी, येवला, सटाणा, सिन्नर, उमराणे व कळवण या समित्यांमध्ये कामकाज सुरू असले तरी शेतकर्‍यांनी मालविक्रीसाठी आणला नाही.

मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारपासून संप अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. यावेळी बाजार समित्यांमध्ये मालविक्री होऊ नये तसेच मुंबई-पुणे-नाशिकसह राज्यातील मुख्य शहरांची रसद बंद करण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने अधिकची खबरदारी घेतली आहे. ज्या शेतकर्‍यांना मालविक्रीसाठी बाजारात आणायचा आहे त्यांनी बिनदिक्कतपणे तो आणावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच गरज वाटल्यास शेतकर्‍यांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास तत्काळ त्यांना संरक्षण दिले जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्यामधून दुसर्‍या जिल्ह्यांमध्ये होणारी भाजीपाल्याची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. गरज वाटेल तेथे एकाचवेळी 10 ते 12 वाहने पोलीस बंदोबस्तात रवाना केले जातील, अशीही माहिती प्रशासनाने दिली.