Wed, Jul 24, 2019 08:29होमपेज › Nashik › सिन्नरच्या शेतकरी महिलेची कर्जाला कंटाळून आत्महत्या

सिन्नरच्या शेतकरी महिलेची कर्जाला कंटाळून आत्महत्या

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:54AMसिन्नर : प्रतिनिधी

तालुक्यातील भोकणी येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.3) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शोभा कांताराम कुर्‍हाडे (42) असे मयत महिलेचे नाव आहे.

कुर्‍हाडे यांनी राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे देण्यात आला.  दरम्यान, कुर्‍हाडे कुटुंबीयांच्या नावावर भोकणी विविध कार्यकारी सोसायटीचे तीन लाखांचे कर्ज होते. सोबतच हातउसनेही 50 हजार रुपये नातेवाईकांकडून घेतले होते. यंदा राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत नाव न आल्याने  कुर्‍हाडे कुटुंबीय तणावाखाली होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. कुर्‍हाडे यांच्या पश्‍चात पती, दोन विवाहित मुली आणि दोन मुले असा परिवार आहे. कुर्‍हाडे यांच्या आत्महत्येने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वावी पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेण्याचे काम सुरू होते.