Sat, Apr 20, 2019 09:51होमपेज › Nashik › नाशिक:घोटी टोलनाक्याजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन

नाशिक:घोटी टोलनाक्याजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन

Published On: Mar 17 2018 10:14AM | Last Updated: Mar 17 2018 10:57AMगतपुरी : प्रतिनिधी

घोटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता भाजीपाला विक्री केंद्र स्थलांतरित केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले. सर्व भाजीपाल्याला मिळणाऱ्या कमी भावाचा निषेध केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल रस्त्यावर ओतून बाजार समितीवरील आपला रोष व्यक्त केला. दरम्यान यावेळी बाजार समितीचा एकही पदाधिकारी अथवा सचिव हजर न झाल्याने शेतकऱ्यांनी अनेक तास महामार्गावर ठिय्या मांडला.

घोटी बाजार समितीने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता आज अचानक भाजीपाला विक्री केंद्र शहराबाहेर स्थलांतरित केले. यामुळे तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला. स्थलांतरीत केलेल्या जागेत कोणत्याही सोयीसुविधा न देता बाजार स्थलांतरित करण्याचा एकतर्फी निर्णय बाजार समितीने घेतल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ सकाळी आठ वाजता सर्व शेतकरी संघटित झाले. यामध्ये शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष भास्कर गुंजाळ्, पंचायत समिती गटनेते विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले. मुंबई आग्रा महामार्गावर या शेतकऱ्यांनी ठिय्या मांडीत महामार्ग रोखून धरला. बाजार समितीवर भाजीपाला विक्री केंद्र आहे त्याच ठिकाणी ठेऊन शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा द्याव्यात, शेतीमालाला हमीभाव मिळावा अशा मागण्यांसाठी शेतकरी यावेळी आक्रमक झाला.

दरम्यान या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक अनेक काळ ठप्प असून वाहनाच्या ८ ते १० कि. मी. पर्यंत दुतर्फा लांब रांगा लागल्या आहेत.
दरम्यान घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके, संदीप गुळवे व तहसीलदार अनिल पुरे यांनी लेखी अश्वासन दिले. याबाबत तोडगा काढण्यासाठी सोमवारी शेतकरी, व्यापारी व घोटी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक घेण्याचे ठरल्याने तुर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आले.