होमपेज › Nashik › ..तर शेतकर्‍यांचे व्याजही सरकार भरेल

..तर शेतकर्‍यांचे व्याजही सरकार भरेल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : विशेष प्रतिनिधी

पक्ष बळकटीकरणासाठी पक्षाच्या वतीने विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. त्यातून पक्षसंघटन मजबूत केले जाणार असून, त्याच बळावर पुन्हा भाजपा सत्तेत येईल, असा विश्‍वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्‍त केला. याशिवाय कर्जमाफीला उशीर झाला असला तरी प्रसंगी शेतकर्‍यांचे व्याजही सरकार भरेल, असा दावाही त्यांनी केला. हॉटेल रॉयल हेरिटेजमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रवक्‍ते केशव उपाध्ये, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप आदी उपस्थित होते.

यावेळी दानवे म्हणाले की, औरंगाबाद येथील बैठकीनंतर नाशिक, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ याप्रमाणे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरात 91 हजार बूथ गठीत केले जाणार असून, त्यापैकी 70 टक्के काम झाले आहे. आगामी 3 महिन्यांत उरलेले 30 टक्के काम पूर्ण होईल. राज्यातील 288 मतदारसंघात कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करण्यासाठी या बैठका घेतल्या जात आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी पक्षाने एका विस्तारकाची नेमणूक केली आहे. कारण याच  संघटनात्मक  बांधणीवर भाजपाने यापूर्वी निवडणुका जिंकल्या आहेत.

शिवसेनेशी नेहमी वाद होत असले तरी त्यांच्याशी असलेले प्रेम जगजाहीर आहे.आरोप-प्रत्यारोप सुरू असतात. सरकार  पाच वर्षांचा कार्यकाळ सरकार पूर्ण करेल आणि सर्व आश्‍वासनेही पूर्ण करेल. कर्जमाफी प्रक्रियेच्या घोळाबाबत बोलताना कर्जमाफीला उशीर झाला असला तरी वेळ पडली तर शेतकर्‍यांचे व्याजही सरकार भरेल असा दावा केला.

राणे यांचे नाव आता मागे पडले...

विधान परिषद निवडणुकीसाठी नारायण राणे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यावर दानवे यांनी नारायण राणे यांचे नाव आता मागे पडले आहे. त्यांच्यानंतर शायना एनसी, माधव भंडारी यांची नावे सध्या चर्चेत आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असून त्यानंतर याप्रश्‍नी निर्णय घेतला जाईल, असेही दानवे म्हणाले.