होमपेज › Nashik › बेडसे, दराडे समर्थकांत ‘सोशल वॉर’

बेडसे, दराडे समर्थकांत ‘सोशल वॉर’

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 10:58PMशिक्षक मतदारसंघ निवडणूक : विजयाचे दावे करणारे फेक सर्व्हे व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल

नाशिक : प्रतिनिधी

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांमध्ये टशन असताना मतदानाच्या दिवशी त्यांच्या समर्थकांमध्ये ‘सोशल वॉर’ पाहायला मिळाला. राष्ट्रवादी आणि टीडीएफ बोरस्ते-मोरे गटाचे पुरस्कृत संदीप बेडसे आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार किशोर दराडे यांच्या समर्थकांकडून दिवसभर विजयाचे दावे केले जाणारे फेक सर्व्हे व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केले जात होते. शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तर फेक सर्व्हेचे पीक आले होते. बेडसे व दराडे यांच्यातील रस्त्यावरील लढाई सोशल मीडियावरही पाहायला मिळाली. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये तणावाचे वातावरण होते.

नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा उमेदवारांनी प्रतिष्ठेची केली होती. शिक्षकांना खूश करण्यासाठी लक्ष्मीदर्शन, साड्या व पैठणी वाटप, रात्रीच्या पार्ट्या व पंगती या सर्व प्रकाराची निवडणुकीत जोरदार चर्चा होती. त्यातही बेडसे आणि दराडे यांच्यातील वाद व आरोप-प्रत्यारोप यामुळे निवडणूक चुरशीची बनली होती. या संघर्षाची प्रचिती मतदानाच्या दिवशीही पाहायला मिळाली. किशोर दराडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची फेक पोस्ट सोशल मीडियावर सकाळपासूनच व्हायरल झाली होती. बेडसे समर्थकांकडूनच ही पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचा आरोप दराडे समर्थकांनी केला. या आशयाच्या पोस्टमुळे बेडसे व दराडे समर्थकांमध्ये मतदान केंद्राबाहेरच जोरदार हाणामारी झाली. एवढ्यावरच न थांबता सोशल मीडियावर हा वॉर दिवसभर सुरू होता. त्यानंतर बेडसे व दराडे समर्थकांकडून विजयाचे दावे करणारे फेक सर्व्हे शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप गु्रपवर फॉरवर्ड केले जात होते. बेडसे यांनी पाचही जिल्ह्यांत आघाडी घेतली असून, चुरशीच्या लढाईत ते विजयी होतील, अशी पोस्ट बेडसे समर्थकांकडून व्हायरल केली जात होती. या सोशल वॉरमध्ये दुपारनंतर दराडे समर्थकांनीही उडी घेतली. त्यांनीदेखील दराडे विजयी होतील, अशी पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपवर टाकत प्रत्युत्तर दिले. दराडे हे पहिल्या फेरीत निवडून येतील. अशी पोस्ट व्हायरल केली जात होती.