Fri, Nov 16, 2018 04:28होमपेज › Nashik › प्रकाश होळकर यांच्या काव्यसंग्रहाची बनावट प्रत

प्रकाश होळकर यांच्या काव्यसंग्रहाची बनावट प्रत

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 23 2018 12:00AMनाशिक : प्रतिनिधी

लासलगाव येथील प्रख्यात कवी प्रकाश होळकर यांच्या ‘कोरडे नक्षत्र’ या गाजलेल्या काव्यसंग्रहाची बनावट प्रत प्रसिद्ध करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयित सविता पन्हाळे या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रकाश होळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी 1997 साली ‘कोरडे नक्षत्र’ हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून साहित्य क्षेत्रातील मान्यवर व्यक्‍तींनी फोन करून या काव्यसंग्रहाची नवी आवृत्‍ती आली आहे का, अशी विचारणा होळकर यांच्याकडे केली. त्यामुळे त्यांनी शहानिशा केली असता हा प्रकार उघडकीस आला. संशयित सविता पन्हाळे या महिलेने सातपूर येथील एका प्रकाशन कंपनीतून कोरडे नक्षत्र नावाने 2 हजार प्रति छापल्या. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ बदलण्यात आले तसेच प्रकाशिका म्हणून सविता यांनी त्यांचच्या आईचे नाव टाकलेले होते. त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या काही प्रति संशयित सविता यांनी पत्रकार आणि राज्यभरातील साहित्यिकांनाही पाठवल्या. त्यामुळे कवी होळकर यांच्यासह प्रकाशक आणि प्रकाशिकांची पूर्वपरवानगी न घेता काव्यसंग्रहाचे बनावटीकरण केल्याप्रकरणी सविता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पत्नी असल्याचाही दावा : संशयित सविता यांनी काव्यसंग्रह छापताना मुद्रक कंपनीच्या व्यवस्थापकास सांगितले की, माझे पती प्रकाश होळकर यांची तब्येत बिघडल्याने हा काव्यसंग्रह पेनड्राइव्हमध्ये आणला आहे. त्याच्या प्रति आम्हाला तातडीने छापून द्या, असे सांगून 50 हजार रुपये धनादेशाद्वारे दिले होते. त्याचप्रमाणे संशयितेने राज्यभर स्वत:ची ओळख होळकर यांची पत्नी असल्याची करून देत मानसिक त्रास दिला. होळकर व त्यांच्या पत्नीचा घटस्फोट झाल्याच्याही अफवा सविता पन्हाळेंनी पसरवल्याचा आरोप प्रकाश होळकर यांनी केला आहे. या त्रासापायी होळकर यांना त्यांचे मोबाइल क्रमांक आणि घरचा फोन क्रमांकही बदलावा लागला आहे.