Thu, Apr 25, 2019 21:32होमपेज › Nashik › ‘ऑनलाइन बिंगो’ जुगारात तरुणांची पिळवणूक

‘ऑनलाइन बिंगो’ जुगारात तरुणांची पिळवणूक

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 12 2018 1:05AMपंचवटी : देवानंद बैरागी

नाशिक शहरात मोबाइलवर ऑनलाइन चालणार्‍या बिंगो जुगाराने अक्षरश: धुमाकूळ घातला असून, शहरातील युवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी झटपट पैसे कमावण्याच्या लालसेने त्याकडे आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होत आहेत. याकडे शहर पोलीस दलाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा खुद्द पोलीस दलात सुरू झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हा बिंगो जुगार चालविणारा एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचाच नातलग असून, त्यात संबंधित अधिकार्‍याचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती पोलीस सूत्रांनीच दिली.

सध्या नाशिक शहरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात पोलीस प्रशासनाला बर्‍यापैकी यश आले होते. त्यात मटका, पत्त्यांचे क्लब, जुगार, बॉलगेम, सोरट, झटपट लॉटरी, अंदर बाहर, रोलेट, कालापिला असे अवैध धंदे रस्त्यावर एखादे दुकान अथवा जागेत करावे लागत होते. त्यासाठी मोठे मनुष्यबळ लागत होते. शिवाय पोलिसांना हप्ता, त्यातही हप्ते देऊनसुद्धा छापासत्र सुरू असायचे. काळ बदलला तसे इंटरनेटच्या जगात वावरत त्याचा फायदा अवैध धंदे चालकांनी उचलला आहे. परिणामी, रस्त्यावर बसून धंदे करणार्‍यांनी आपला मोर्चा ऑनलाइन बिंगो गेमकडे वळविला आहे. ऑनलाइन बिंगो गेममध्ये ऑनलाइन पैसे टाकणे आणि ऑनलाइनच पैसे काढण्याची पद्धत आहे. त्यासाठी शहरात जिल्हाभरासाठी एका एजंटची नियुक्‍ती करण्यात येते. हा एजंट शहरातील सराईत गुन्हेगार, राजकीय नेत्यांचे पंटर, पैसेवाले असामी शोधून त्यांना या धंद्यात आणतो. गल्‍लोगल्ली अशा प्रकारे सबएजंट तयार करून त्यांच्या नावाचा आयडी तयार करून त्या खात्यावर लाखो रुपयांचे पॉइंट जमा करतो. (पॉइंटला हे लोक किल्ली मारणे म्हणतात) त्यानंतर हे सबएजंट अनेक युवकांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या ऑनलाइन जुगाराच्या जाळ्यात ओढून त्यांना जुगाराच्या आहारी घेऊन जातात.

या बिंगो जुगाराची नशा कधी जडते आणि हे युवक कधी कर्जबाजारी होतात याचे त्यांनाही भान राहत नाही. मग हे युवक कोणत्याही थराला जात घरातील किमती वस्तू चोरणे, अभ्यासाच्या नावाखाली घरातून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यातून जुगाराची भूक भागविण्याची हिंमत करतात. या जुगाराच्या जाळ्यात अडकलेल्या अनेक युवकांच्या घरी पैसे वसुलीसाठी या एजंटांचे गुंड जाऊन खंडणी वसूल करीत असल्याचे बोलले जात आहे.  मात्र, बदनामी नको म्हणून पालकदेखील पोलीस ठाण्यात जाण्याचे टाळत असल्याने या एजंटांची हिंमत चांगलीच वाढली आहे. त्यात एखादा पालक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यास त्यांना येथील अधिकारी तुमच्याच मुलाची चूक असल्याचे सांगत गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करीत आहे. हे सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांच्याच वरदहस्ताने सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (क्रमश:)

मुख्य सूत्रधार सराईत

ऑनलाइन बिंगो गेमचा नाशिकचा मुख्य सूत्रधार नाशिकरोड येथील नारायण बापूनगर येथे राहणारा सराईत गुन्हेगार आहे. शहर पोलीस दलात कार्यरत असणार्‍या एका वरिष्ठ अधिकार्‍याचा नातेवाईक असल्याने त्यांना हाताशी धरून पोलीस खात्यातील जवळपास सर्व अर्थपूर्ण देवाण घेवाण सहज हाताळली जात आहे. यासाठी नाशिकरोड येथील एक खासगी सावकार आर्थिक रसद पुरविण्याचे काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.