होमपेज › Nashik › ‘त्या’ अपंगांच्या चौकशीसाठी तज्ज्ञ समिती नियुक्‍त

‘त्या’ अपंगांच्या चौकशीसाठी तज्ज्ञ समिती नियुक्‍त

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 13 2018 1:43AMनाशिक : प्रतिनिधी

बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून 12 कर्मचार्‍यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरी मिळवल्याची तक्रार आरोग्य उपसंचालकांना मिळाल्यानंतर त्याची शहानिशा करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. मात्र, या समितीत तज्ज्ञ नसल्याने चौकशीसाठी दुसरी समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात संबंधित कर्मचार्‍यांचा अहवाल मिळण्याची शक्यता आहे. 

जिल्हा शासकीय रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात नोकरी करताना बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून सरकारी फायदे घेण्याचा आरोप निवेदनाद्वारे आरोग्य उपसंचालक डॉ. एल. आर. घोडके यांच्याकडे करण्यात आला आहे. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी आरोग्य उपसंचालकांनी 12 अपंग कर्मचार्‍यांची यादी जिल्हा रुग्णालयास देत त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशानुसार जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाने चौकशीचा मुहूर्त लावला नव्हता. दै. ‘पुढारी’ने यासंदर्भात वृत्तास वाचा फोडल्यानंतर संबंधित अपंग कर्मचार्‍यांच्या अपंग प्रमाणपत्रांची छाननी सुरु करण्यात आली. त्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीकडून 15 दिवसांत अहवाल येणे अपेक्षित होते. मात्र, या समितीत तज्ज्ञ व्यक्‍ती नसल्याने या समितीमार्फत अपंगांची चौकशी करणे शक्य नव्हते. यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. राजेश कोशिरे आणि डॉ. सिद्धार्थ शेळके यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीमार्फत संबंधितांची चौकशी करून त्यांचा अहवाल येत्या सात दिवसांत सादर केला जाईल, असे डॉ. जगदाळे यांनी सांगितले.