होमपेज › Nashik › चौकांमधील अतिक्रमणेही हटविणार

चौकांमधील अतिक्रमणेही हटविणार

Published On: Mar 11 2018 1:23AM | Last Updated: Mar 10 2018 11:44PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरासह परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेचा धसका राजकारण्यांपासून अतिक्रमणधारकांनी घेतला आहे. यामुळे अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच अनेकांनी आपापले अतिक्रमण काढून घेत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याबरोबरच चौकांमधील अतिक्रमणेही जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच शहरासह परिसरातील सर्वच सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याचे आदेश अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिले होते. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून या विभागाचे उपायुक्‍त आर. एम. बहिरम यांच्या नेतृत्वाखाली पंचवटी, पूर्व, पश्‍चिम, नाशिकरोड, सातपूर व सिडको या सहाही विभागांत अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी त्या-त्या विभागीय अधिकार्‍यांवर ही मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून शहरात तसेच उपनगरांमध्ये अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांचा जणू महापूरच आला होता. असे असताना तसेच अधिकार असूनही विभागीय अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष केले जात होते. राजकीय दबाव आणि अतिक्रमण विभागातील काही अधिकारी व कर्मचारी चिरीमिरी घेऊन अतिक्रमण करणार्‍यांना पाठीशी घालण्याचे काम आजवर करीत होते.

बहुतांश ठिकाणी तर अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक रस्तेही व्यापले होते. यामुळे पादचार्‍यांना चालण्यासही जागा शिल्लक राहत नव्हती. तर वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने वाहनेदेखील रस्त्यावर पार्क करण्याची वेळ नाशिककरांवर आली होती. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मोहिमेने अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटली गेल्याने अनेक ठिकाणचे रूपडे पालटले आहे. यासंदर्भात सामान्य नाशिककरांनी मनपाच्या या मोहिमेबद्दल समाधान व्यक्‍त केले आहे. शहरातील 30 मीटरपासून ते सहा मीटरपर्यंतच्या सर्वच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याचे मनपाने कळविले आहे. 

प्रमुख रस्त्यांसह छोट्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविल्यानंतर महापालिकेच्या सहाही विभागांकडून चौकांमधील अतिक्रमणांकडे मोर्चा वळविला जाणार आहे. सिडको व सातपूर सारख्या ठिकाणी तर चौकांमधील अतिक्रमणांचे प्रमाण सर्वाधिक मोठे आहे. अनेक ठिकाणी रहिवाशांनी दहा ते 12 फुटीचे ओटे बांधले आहेत. अनेक व्यावसायिकांनी चौकांचा वापर व्यवसायासाठी केला आहे तर अनेकांनी जिने आणि भिंती बांधून चौकांची जागा व्यापली आहे. यामुळे या जागा रिक्‍त करून घेण्यासाठीदेखील मोहीम हाती घेतली जाणार आहे.