Fri, Apr 20, 2018 06:25



होमपेज › Nashik › खडसे, भुजबळ संबंध ३ दिवसात जाहीर करणार : अंजली दमानिया

खडसे, भुजबळ संबंध ३ दिवसात जाहीर करणार : अंजली दमानिया

Published On: Apr 16 2018 4:07PM | Last Updated: Apr 16 2018 4:07PM



जळगाव : प्रतिनिधी

छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्यातील संबंध आपण तीन ते चार दिवसात जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट अंजली दमानिया यांनी आज (सोमवार दि.16) केला. दुपारी रावेर न्यायालयातील कामकाज झाल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी माझ्यावर 22 ठिकाणी खटले दाखल केले आहेत. मात्र एकही खटला खडसे यांनी दाखल केलेला नाही. हे सर्व खटले कार्यकर्त्यांनी दाखल केले आहेत. कारण त्यांनी जर खटला दाखल केला असता तर त्यांना मी जेरीस आणले असते. या खटल्याप्रकरणी आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत संबंधितांना नोटीसादेखील पोहच झाल्या आहेत. आपणास न्याय मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कल्पना इनामदार यांनी भुजबळ यांच्या केसमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ऑफर दिल्याचाही गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

त्या म्हणाल्या की, येत्या तीन ते चार दिवसात भुजबळ व खडसे यांचे संबंध आपण जाहीर करू. आपल्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी खडसे यांनी केली आहे. मात्र सीबीआयच काय यापेक्षा मोठी चौकशी त्यांची होईल व खडसे यांनाच शिक्षा भोगावी लागेल. खडसेंविरुद्ध हा लढा जून 2016पासून सुरू असून गव्हर्नरांच्याकडे आपण तक्रारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी कल्पना ईनामदार यांनी केलेल्या आरोपाबद्दल विचाराले असता अंजली दमानिया म्हणाल्या की, कल्पना ईनामदार ह्या 2 डिसेंबर 2014 रोजी आपल्या घरी आल्या होत्या. भुजबळ यांच्या केसमधून बाहेर पडा तुम्हाला हवे ते पोहोचवू अशी ऑफर त्यांनी दिली होती. याच दिवशी एका खासगी वाहिनीवर इनामदार यांना आपण उघडे पाडल्याने त्यांनी आपल्यावर निरर्थक आरोप केल्याचे दमानिया म्हणाल्या. अण्णांच्या कोअर कमिटीतील या व्यक्तीबाबत आपण अण्णांना सर्व माहिती दिल्याचे ही त्यांनी सांगितले.

माजी मंत्री खडसे यांच्या बदनामी प्रकरणी दाखल असलेल्या खटल्याच्या तारखांना अनुपस्थित राहत असलेल्या अजंली दमानिया यांना सांताक्रुझ पोलिसांनी अटक वॉरंट बजावले होते. याप्रकरणी आज दमानिया रावेर न्यायालयात हजर झाल्या असता त्यांनी न्या.डी.जी. मालवीय यांच्याकडे आपली बाजू मांडली. यावेळी तक्राराकर्त्यांचे वकील अ‍ॅड.चंद्रजीत पाटील यांनी बाजू मांडतांना सांगितले की, दमानिया ह्या वारंवार गैरहजर राहतात. त्यामुळे त्यांना पीआर बॉण्ड सोडू नये त्यांचे अटक वॉरट रद्द करू नये अशी विनंती न्यायालया केली. न्यायालयाने दोघांचे म्हणणे ऐकून दमानिया यानां 300 रूपयांचा दंड करून 15 हजारांच्या पीआर बॉण्डवर त्यांची सुटका केली.