Thu, Nov 15, 2018 22:28होमपेज › Nashik › शैक्षणिक शुल्क सवलतीपासून विद्यार्थी वंचित

शैक्षणिक शुल्क सवलतीपासून विद्यार्थी वंचित

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत देण्यासाठी मागणीच्या तुलनेत अल्प निधी प्राप्त झाल्याने बहुतांश विद्यार्थी यावर्षी या लाभापासून वंचित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाला 39 लाखांपैकी आतापर्यंत अवघे 16 लाख रुपयेच प्राप्त झाल्याने नेमक्या किती विद्यार्थ्यांना लाभ द्यावा, असा प्रश्‍न अधिकार्‍यांना पडला आहे. एक लाख दहा हजार लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते, तर अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत देण्यात येते. म्हणजे, या विद्यार्थ्यांची फी पालकांकडून वसूल न करता सरकारच त्यासाठी लागणारी रक्कम दरवर्षी उपलब्ध करून देत असते. माध्यमिक शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत देण्यासाठी 39 लाख रुपयांची मागणी सरकारकडे नोंदविण्यात आली. यापैकी अवघे 16 लाख रुपयेच उपलब्ध करून देण्यात आल्याने शिक्षण विभागाची डोकेदुखी वाढली आहे. मागणीइतका निधी उपलब्ध न झाल्याने या वर्षातील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत देता येणे शक्य होणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे जेवढी रक्कम प्राप्त झाली, त्यात बसतील तेवढ्याच विद्यार्थ्यांना लाभ देता येणार आहे.शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी सर्वच योजनांच्या तरतुदींना तीस टक्के याप्रमाणे कात्री लावण्यात आली होती. त्यात शैक्षणिक फी सवलतीच्या निधीचाही समावेश आहे काय, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.


  •