Tue, Mar 19, 2019 09:35होमपेज › Nashik › नाशिकमध्ये चिंधीचोरांचा 'डस्‍टबीन'वरही डल्‍ला

नाशिकमध्ये चिंधीचोरांचा 'डस्‍टबीन'वरही डल्‍ला

Published On: Dec 19 2017 4:20PM | Last Updated: Dec 19 2017 4:20PM

बुकमार्क करा

सातपूर : वार्ताहर

केंद्र सरकार कितीही स्‍वच्‍छतेसाठी प्रयत्‍न करो. मात्र, लोकांच्या मनातील घाण गेल्याशिवाय स्‍वच्‍छता होणे कठीण आहे. याचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. महापालिकेने स्‍वच्‍छ भारत अभियानानुसार शहरात २१ लाख खर्चून डस्‍टबीन(कचरापेटी) ठेवल्या. मात्र, काही चोरट्यांनी त्यावरही डल्‍ला मारत त्या लंपास केल्या. 

नाशिक महापालिकेने केंद्र सरकारच्या स्‍वच्‍छ भारत अभियान व स्‍मार्ट सिटीच्या क्रमवारीत अव्‍वल येण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी शहरात १८९ कचरा पेट्या बसवल्या आहेत. या कचरापेट्याही चोरट्यांनी लंपास करण्यास सुरुवात केली आहे. सातपूर येथील अशोकनगरमध्ये बसविण्यात आलेली ९९ क्रमांकाची कचरापेटी चोरीला गेली. तसेच इतर कचरापेट्यांची झाकणेही चोरीला गेल्याचे चित्र आहे. 

महापालिकेने कचरापेट्या चोरीला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या साखळीने लॉक केल्या होत्या. मात्र, साखळी तोडून पेट्या लंपास करण्यात आल्या आहेत.  कचरापेट्या बसविलेल्या ठिकाणी नागरिक कचरा उघड्यावरच टाकताना दिसत आहेत. त्यामुळे स्‍थानिकांनची डोकेदुखी वाढली आहे. तसेच परिसरात घाणीचे साम्राज्यही वाढू लागले आहे. 

शहराच्या स्‍वच्‍छतेसाठी महापालिकेने लाखो खर्चून केलेल्या उपाययोजनेचा असा बोजवारा उडाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्‍त होत आहे. तसेच कचरापेटीच्या ठिकाणी पडलेला कचरा घंटागाडी कर्मचारी उचलत नसल्याने नाशिककर त्रस्‍त आहेत.