Sun, Mar 24, 2019 06:15होमपेज › Nashik › पिसाळलेल्या कुत्र्याचा मुलीला ३२ ठिकाणी चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा मुलीला ३२ ठिकाणी चावा

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:42AMइंदिरानगर : वार्ताहर 

राजीवनगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने शाळकरी मुलीला चावा घेतल्याची घटना राजीवनगर भागात घडली. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

राजीवनगर येथील अनुजा अपार्टमेंटमध्ये राहणारी अशना तोडकर (13) ही विद्यार्थिनी रात्रीच्या सुमारास घरी जात असताना रस्त्यात पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. हात, पाय, आणि पाठीला तब्बल 32 वेळा चावा घेत जखमी केले. या प्रकाराने भयभीत झालेल्या विद्यार्थिनीची परिसरातील नागरिकांनी कुत्र्याच्या तावडीतून सुटका करत तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.  काही दिवसांपूर्वी मोकाट गायींच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती.

मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री यांचा या भागात मोठा सुळसुळाट झाला आहे. मोकाट जनावरांच्या या हल्ल्यामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली आले आहेत.  मनपा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

पिसाळलेल्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात सध्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोकाट कुत्री दिसत आहेत. मोकाट कुत्री थेट नागरिकांवर हल्ला करतात. यात अनेक दुचाकीस्वार पडून जखमी होतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांवर मोकाट कुत्री हल्ला करीत आहेत. महापालिकेने श्‍वान निर्बीजीकरणाच्या मोहिमेला वेग देण्याची गरज आहे. - राम नागरे,  नागरिक