Thu, Jul 18, 2019 14:24होमपेज › Nashik › १० कोटी कुटुंबांना आरोग्य संरक्षण मिळणार : डॉ. भामरे

१० कोटी कुटुंबांना आरोग्य संरक्षण मिळणार : डॉ. भामरे

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: May 01 2018 12:24AMधुळे : प्रतिनिधी

‘आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन’मध्ये देशातील सुमारे 10 कोटी कुटुंबांना आरोग्य संरक्षण पुरविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी न्याहळोद येथे केले. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रोगनिदान मेळावा व शिबिर धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील आरोग्य केंद्रात सोमवारी आयोजित करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भामरे बोलत होते. यावेळी सरपंच ज्योतीबाई भिल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. तरन्नूम पटेल आदी उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून आपण वैद्यकीय सेवेत कार्यरत आहोत. कर्करोग, हृदरोगासारख्या आजारांवरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येतो. तो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. या पार्श्‍वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील सुमारे 50 कोटी लोकसंख्येला या योजनेचा लाभ मिळू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजाच्या तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. या योजनांची माहिती परिणामकारकपणे पोहोचली पाहिजे.

‘आयुष्यमान भारत’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात वार्षिक रुपये पाच लाखांपर्यंत शस्त्रक्रिया व उपचार पद्धतीचा लाभ घेता येणार आहे. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजनेचाही नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही मंत्री डॉ. भामरे यांनी नमूद केले. यावेळी बापू खलाणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे यांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी प्रा. अरविंद जाधव, राम भदाणे आदी उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबिरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, डॉ. पटेल, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सोनल वानखेडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. जयेश जलाल, डॉ. जितेंद्र जैन, डॉ. अभिषेक ठाकूर, डॉ. विक्रम वानखेडे, डॉ. जयश्री ठाकूर, डॉ. विकास बोरसे, डॉ. महाले आदींनी रुग्णांची तपासणी केली.

यूपीएससी उत्तीर्ण स्वप्नील पवार यांचा सत्कार

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 525 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील पवार यांचा व त्यांच्या आईवडिलांचा डॉ. भामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता जगदीश रोकडे, मल्ल ज्ञानेश्‍वर भोंगे यांचाही मंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.