Tue, Jul 16, 2019 21:49होमपेज › Nashik › अल्‍पवयीन बालिकेवर अत्‍याचार करणार्‍यास अटक

अल्‍पवयीन बालिकेवर अत्‍याचार करणार्‍यास अटक

Published On: Mar 04 2018 3:58PM | Last Updated: Mar 04 2018 3:58PMधुळे प्रतिनिधी : प्रतिनिधी 

दोंडाईचा येथिल एका पाच वर्षे वयाच्या बालिकेवर अत्याचार करणा-या मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. या आरोपीस अटक करण्यासाठी परिसरातील लाल रंगाच्या सुमारे 300 मोटारसायकल मालकांची चौकशी करण्यात आली. या गुन्हयात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल असला तरीही चौकशीत आणखी आरोपी वाढण्याची शक्यता पोलिस अधिक्षक एम रामकुमार यांनी व्यक्त केली आहे. हा अत्याचार शाळेच्या आवारात झाला नसुन, एका खासगी पडक्या घराच्या अंगणात झाल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दोंडाईचा येथे 8 फेब्रुवारी रोजी पाच वर्षे वयाच्या बालिकेवर अत्याचार झाला. या बालिकेवर जळगाव येथे उपचार होत असतांना हा प्रकार उघडकीस आल्याचे वैदयकीय अहवालातुन पुढे आले. यासंदर्भात अत्याचार करणाऱ्या प्रमुख आरोपीसह शैक्षणीक संस्थेचे पदाधिकारी तथा माजी मंत्री हेमंत देशमुख, रविंद्र देशमुख, महेंद्र पाटील, प्रतिक महाले, नंदु सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे खान्देशातील गावांमध्ये संतापाची लाट उसळली. गावांमधे बंद पाळुन मुक मोर्चे काढण्यात आले. तर शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणाची सखोल चौकशी करून प्रमुख आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकाने दोंडाईचा येथुनच रेवनाथ रामसिंग भगत उर्फ भील (वय 35) या आरोपीस अटक केल्याची माहिती पोलिस अधिक्षक रामकुमार यांनी दिली. यावेळी पथकाचे प्रमुख तथा अपर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय अधिकारी संदीप हिरे आणि संदीप गावीत यांच्यासह पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक पी जे राठोड यांच्यासह पथकातील अधिकारी उपस्थित होते. दोंडाईचा येथे बालीकेवर अत्याचार केल्यानंतर आरोपी हा पसार झाला होता. मात्र परीसरात चौकशी करतांना या भागात लाल रंगाची मोटारसायकल आणि काळया रंगाचा टी शर्ट घातलेला तरूण पाहिल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. त्यानुसार पथकाने परिसरातील सुमारे 300 मोटारसायकल मालकांची चौकशी केली. या बरोबरच गावात एका समारंभात एका युवकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या तरूणाचा शोध घेतला असता तो युवक अत्याचाराची घटना घडल्यापासुन फरार असल्याचे दिसुन आले. त्यामुळे पथकाने त्याचा माग काढण्यास सुरूवात केली. अखेर त्याला दोंडाईचा येथुन त्याच्या घरातुन ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत या युवकाने गुन्हा केल्याचे मान्य केले असुन, संबंधीत पीडितेने देखिल त्याला ओळखल्याची माहिती पोलिस अधिक्षक रामकुमार यांनी दिली. अत्याचाराची घटना ही 8 फेब्रुवारी रोजी घडली मात्र गुन्हा जळगाव येथे 17 फेब्रुवारी रोजी दाखल झाला. या विलंबावर देखिल तपासात चौकशी केली जाणार असुन, यात दोषी आढळुन आल्यास संबंधीतांना आरोपी केले जाणार आहे. असे देखिल यावेळी स्पष्ट करण्यात आले.